वडेगाव : ‘मिशन झीरो पेंडन्सी’अंतर्गत शिक्षकांच्या कोणत्याही कार्यालयीन समस्या प्रलंबित न ठेवता त्या त्वरित निकाली काढाव्यात, अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी एम.डी. पारधी यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
चर्चेत, दुय्यम सेवापुस्तक पूर्तेतेसाठी केंद्रनिहाय नियोजन करावे, नामनिर्देशन तथा तालुकांतर्गत शिक्षकांच्या स्थानांतरणाची नोंद त्वरित मूळ सेवापुस्तकात घ्यावी, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी टप्प्यानिहाय तक्त्याची एक प्रत लवकरच सर्व शिक्षकांना दिली जावी, सत्र २०१८-१९ च्या जी.पी.एफ. पावत्या प्राप्त होताच केंद्रनिहाय रीतसर वाटप केले जावे, निवडश्रेणी व चटोपाध्याय नवीन प्रकरण तयार करुन जि.प.कडे सादर करावे हे विषय मांडण्यात आले. यावर पारधी यांनी आपल्या स्तरावरील सर्वच समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
संचालन अशोक बिसेन यांनी केले. आभार नोकलाल शरणागत यांनी मानले. चर्चेला शिक्षक समितीचे शाखाध्यक्ष पी.आर. पारधी, जिल्हा कार्याध्यक्ष डी.एच. चौधरी, तालुकाध्यक्ष संजय बोपचे, तालुका सरचिटणीस विलास डोंगरे, संचालक प्रदीप रंगारी, माजी संचालक वाय.बी. चव्हाण, कार्याध्यक्ष टी.के. बोपचे, जिल्हा महिला प्रतिनिधी अल्का बडवाईक, तालुका नेते आर.एच. ठाकरे, बी.सी. ठाकरे, मनोज गेडाम, राजेश जौंजाळ, अशोक रिनाईत, परमानंद धार्मिक, तानसेन जमईवार, राजू गाढवे, राकेश शहारे आदी उपस्थित होते.
परीक्षा शुल्क जि.प. निधीतून भरा
चर्चेत, ‘भरारी’ उपक्रमांतर्गत इयत्ता ५ व ८ वीतील जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून भरण्याची संघटनेची मागणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे मांडावी, तसेच कोविड-१९ च्या कारणास्तव शैक्षणिक नुकसान झालेल्या सत्र २०२०-२१ मधील इयत्ता १ ते ८ मधील विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन पद्धतीविषयी विचारणा करण्यात आली. यावर पारधी यांनी, सकारात्मकता दर्शविली, तसेच शक्यतोवर आकारिक मूल्यमापन पद्धतीनुसार मूल्यांकन होणार. तरीपण जिल्हा परिषदेच्या निर्देशांची वाट पाहू व नंतर ठरवू, असे सांगितले.