भंडारा : वन विभागाच्या प्रधान मुख्य संरक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यात पाणपक्षीगणनेचा हा पहिला टप्पा उत्साहात पार पडला. सकाळी ६ ते ११ या कालावधीत पक्षीगणना करण्याचे ठरविण्यात आले होते. साधारणपणे पक्षी सकाळच्या सुमारास तलावावर येतात. परंतु, धुक्यामुळे पक्षीगणनेला फटका बसला.या पक्षीगणनेत सहभागी पक्षीमित्र व निरीक्षकांनी विविध प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद करीत कॅमेराबद्ध केले. यंदा पक्ष्यांची संख्या वाढली कां? याबद्दल आताच निश्चितपणे सांगता येणार नाही, असे पक्षी निरीक्षकांनी सांगितले. वन्यप्राणी प्रगणनेसारखे यावर्षीपासून वन विभाग गंभीर झाल्याचे दिसून येत असून यामुळेच प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दरवर्षी पाणपक्षगणना करण्याचे आदेश काढले. त्यांच्या आदेशानुसार २१ डिसेंबर व ११ जानेवारी रोजी पाणपक्षी गणना करणे वनविभागाला बंधनकारक आहे. त्यानुसार रविवारी पक्षीगणनेचा पहिला टप्पा जिल्ह्यातील भंडारा वनपरिक्षेत्रातील पाचगाव, सातोना, कोकनागढ, डोडमाझरी (आमगाव), रावणवाडी, सिल्ली (आंबाडी), चिखला, पहेला, ऐटेवाई तलाव, अड्याळ वनपरिक्षेत्रातील खुर्शीपार (पुरकाबोडी), भिवखीडकी (केसलापुरी), पवनी वनक्षेत्रातील गोसीखुर्द धरण, वाही जलाशय, तुमसर वनक्षेत्रातील चांदपूर जलाशय, बघेडा तलाव, लेंडेझरी येथील बावनथडी, लाखनी वनक्षेत्रातील सोमनाळा, भुगाव मेंढा, बरडकिन्ही, रेंगेपार (कोहळी), खुर्शीपार, भुगाव चांदोरी, साकोली वनक्षेत्रातील शिवनीबांध, खंडाळा, शिळेगाव, लाखांदूर वनक्षेत्रातील पुयार, लाखांदूर, दिघोरी या तलावांवर घेण्यात आला. येथील पक्षी प्रेमी व काही सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून पार पडलेल्या या पक्षीगणनेत सहभागी झालेल्या पक्षी निरीक्षकांनी सकाळी ६ ते ११ वाजता दरम्यान पक्षी निरीक्षण केले. या निरीक्षणात त्यांनी विविध प्रजातींचे पक्षी टिपल्याचे मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या निरक्षणात पक्षीप्रेमींसह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सोबत होते. पक्षी गणनेत उपवन संरक्षक विनय ठाकरे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. पक्षी निरीक्षणांतर्गत पाणपक्ष्याचा अहवाल प्रधान वन संरक्षकांकडे पाठविला जाणार असल्याचे वनविभागाने सांगितले. (शहर प्रतिनिधी)
पाणपक्षी प्रगणनेला धुक्यांचा फटका
By admin | Published: December 22, 2014 10:41 PM