Bhandara Fire: 'अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की...'; भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका
By मुकेश चव्हाण | Published: January 9, 2021 12:17 PM2021-01-09T12:17:56+5:302021-01-09T12:18:05+5:30
माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. तसेच या घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे, असं अजित पवारांनी सांगितले.
भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारनं याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 9, 2021
तसेच या घटनेबाबत तात्काळ चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी ट्विटरद्वारे दिली. मात्र भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपूत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. निलेश राणे ट्विट करत म्हणाले की, भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालेलं नाही हे लक्षात आले त्या नंतर धरणवीर उपमुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिले. मुळात ह्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही. अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की ते कुणालाच जुमानत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 9, 2021
तत्पूर्वी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी ही घटना समजात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, याबाबत जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत. या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ठेवलं जातं. लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तातडीनं रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने अतिदक्षता विभागातील बाळांना बाहेर काढलं.