जंगलात चार तास पोलीस-चोरट्यांची लपाछपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:55 AM2019-07-28T00:55:23+5:302019-07-28T00:56:23+5:30
पोलीस आणि मोबाईल चोरट्यांचा तब्बल चार तास लपाछपीचा खेळ पिटेसूर-आलेसूरच्या जंगलात रंगला. किर्र अंधाऱ्या रात्री, घनदाट जंगलात चोरट्यांना जेरबंद करण्यात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्या जवळून ३१ मोबाईल हँडसेट, एलसीडी टिव्ही आणि कॉम्प्युटर मॉनिटर हस्तगत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोलीस आणि मोबाईल चोरट्यांचा तब्बल चार तास लपाछपीचा खेळ पिटेसूर-आलेसूरच्या जंगलात रंगला. किर्र अंधाऱ्या रात्री, घनदाट जंगलात चोरट्यांना जेरबंद करण्यात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्या जवळून ३१ मोबाईल हँडसेट, एलसीडी टिव्ही आणि कॉम्प्युटर मॉनिटर हस्तगत केला. या चोरट्यांनी गोबरवाही येथील एका मोबाईल शॉपीतून हा मुद्देमाल लंपास केला होता.
पिंकेश राजू बिटले (१९) रा.दयतबर्रा जि. बालाघाट मध्यप्रदेश आणि प्रिंस छगनलाल सोनगडे (२०) रा.अर्जुनटोला ता.तिरोडी जि.बालाघाट अशी चोरट्यांची नावे आहेत. गोबरवाही येथील कांचन टेलीकॉम सर्व्हीसेस या दुकानात बुधवारी चोरी झाली होती. या घटनेची तक्रार गोबरवाही ठाण्यात देण्यात आली. सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांच्या अधिनस्त सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल पुरी यांनी केली. चोरी मध्यप्रदेशातील दोन चोरट्यांनी केल्याचे पुढे आले. त्यावरून पिंकेश राजू बिटले याला अटक करण्यासाठी पोलीस गेले. मात्र तो पिटेसूर, आलेसूर जंगलात लपून बसला होता. चार तास पाठलाग करून त्याला अटक केली. त्याची चौकशी सुरु केली असता या चोरीत प्रिंस सोनगडे हा सहभागी असल्याचे पुढे आले. त्यावरून त्यालाही पोलिसांनी अटक केली.
भांडणाचा बदला
प्रिन्स व पिंकेश या दोन मोबाईल चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता गोबरवाही येथील मोबाईल शॉपी चालकासोबत रिचार्जवरून भांडण झाले आणि त्याचा बदला म्हणून आपण चोरी केल्याची कबूली दिली. मात्र यावर विश्वास ठेवायला पोलीस तयार नाही. यातील प्रिन्स हा बीएससी अंतिम वर्षापर्यंत शिकलेला असून पिंकेश हा फ्लोअर ब्लॉकचे काम करतो. या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, ३१ मोबाईल हँडसेट, मोबाईल अॅसेसरी, एलसीडी टिव्ही, कॉम्प्युटर मॉनिटर असा १ लाख २९ हजार ९६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.