विरली येथे डेंग्युसदृश तापाचे चार रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:35 AM2021-07-29T04:35:10+5:302021-07-29T04:35:10+5:30
विरली बुज. येथे गत चार-पाच दिवसांपासून तापाची साथ आली आहे. गावातील मोहित शंकर चुटे (१६), सुरेश सदाशिव घावळे (२६), ...
विरली बुज. येथे गत चार-पाच दिवसांपासून तापाची साथ आली आहे. गावातील मोहित शंकर चुटे (१६), सुरेश सदाशिव घावळे (२६), शुभम संजय चुटे (१६) आणि मयूरी खुशाल चुटे (१८) या चौघांची आसगाव येथील खासगी पॅथाॅलाॅजीमध्ये तपासणी करण्यात आली. त्यांना डेंग्यूसदृश लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांच्यावर ब्रम्हपुरी, लाखनी आणि पवनी येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यापैकी मोहित चुटे याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
गावातील तापाच्या साथीची दखल घेऊन आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी विवेक बन्सोड यांनी गावात सर्वेक्षण केले. गावकऱ्यांना डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती देत अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात गावात सर्वसाधारण तापाचे रुग्ण आढळून आले. डेंग्यूचा रुग्ण आढळला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण कोणत्या तापाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी उपाययोजना म्हणून साचलेले पाणी वाहते करावे आणि झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विवेक बन्सोड यांनी सांगितले. गावात सध्या तापाचे रुग्ण असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. वैद्यकीय यंत्रणा गावावर लक्ष ठेवून असल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले.