साकोली : सध्या साकोली तालुक्यात अवैध रेती तस्करी खुलेआम सुरू आहे. यावर महसूल विभाग कार्यवाही करीत असले तरी अवैध रेती तस्करी पूर्णपणे थांबत नाही. रात्रीपासून महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी रेतीघाटावर तळ मांडून बसले. यात चार ट्रॅक्टर जप्त करण्यात आले, मात्र एक ट्रॅक्टरचालक पोलिसांना पाहून वाहनासह पळून गेला. पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही, हे विशेष.
साकोली तालुक्यातील दोन रेतीघाटांचे लिलाव झाले असून, उर्वरित रेतीघाटांचे लिलावच झाले नाहीत. त्यामुळे ज्या घाटांतील लिलाव झाला त्या घाटांतून रेती विकत घ्यावी लागते. म्हणून रेती तस्कर ज्या रेतीघाटांचे लिलाव झाले नाहीत त्या रेतीघाटांतून अवैधरीत्या रेतीचा उपसा करीत आहेत. त्यामुळे शासनाला दररोज कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील लवारी, उमरी या रेतीघाटांतून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यामुळे रात्रीच महसूल विभागाचे नायब तहसीलदार पवार, तलाठी शेखर ठाकरे, हटवार, बिसेन हे दाखल झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने सापळा रचत तीन ट्रॅक्टरला घाटावर रेतीची तस्करी करताना पकडून तहसील कार्यालयात आणले. दरम्यान, आज सकाळी पुन्हा अवैध रेती तस्करी सुरू असल्याची माहिती मिळताच महसूलचा ताफा रेतीघाटावर पोहोचला. या वेळी दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले. मात्र तस्करांनी एकच गदारोळ केला. त्यामुळे महसूलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांचाही ताफा घटनास्थळावर आला. मात्र पोलिसांसमोर एक ट्रॅक्टर रेतीघाटातून पसार झाला. तरीही पोलिसांनी त्या ट्रॅक्टरला अडविले नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून आले.