भंडारा : शेकडा चार टक्के व्याजदराने घेतलेली रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केली; पण दुसऱ्या दिवशी हस्तकामार्फत ३५ लक्ष ८४ हजार रुपयांची उचल करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी विजय खोब्रागडे यांनी केला आहे. यासंदर्भात बीटीबी सब्जीमंडीचे संचालक बंडू बारापात्रे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून खोब्रागडे यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, विजय खोब्रागडे आणि त्यांच्या पत्नीचे मोगरा येथे तलाठी सजाअंतर्गत ८ हेक्टर ३१ आर शेतजमीन होती. शेतीला पूरक व्यवसायासाठी त्यांनी डेरी फार्मकरिता देना बँक शाखा भंडारा येथून सन २०१४ मध्ये ५३ लक्ष रुपये कर्जाची उचल केली; परंतु व्यवसाय बुडाल्याने कर्जाची परतफेड करू न शकल्याने बँकेने कारवाईसाठी नोटीस बजावली. मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याने अजय भोंगाडे यांच्या सूचनेवरून बीटीबी सब्जी मंडीचे संचालक बंडू बारापात्रे व पौर्णिमा बारापात्रे यांच्याकडून मार्च २०१९ मध्ये शेकडा ४ टक्के व्याजदराने तथा विजय खोब्रागडे यांच्याकडे असलेली शेतजमीन गहाण टाकून व कोरे धनादेश देण्याच्या अटीवर सदर रक्कम कर्जरूपाने देण्याचे ठरविण्यात आले, असे विजय खोब्रागडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. ठरलेल्या अटीनुसार मोगरा शिवणी येथील शेतजमीन नमुना, सातबारा व आधार कार्ड व पासपोर्ट छायाचित्र व कोरे धनादेश देण्यात आले. यात ऑगस्ट २०१९ ते १३ सप्टेंबर २०१९ या कालावधीत विजय खोब्रागडे यांच्या देना बँक शाखेतील खात्यामध्ये बारापात्रे यांनी 35 लाख 84 हजार रुपये जमा केले; परंतु ३ सप्टेंबर २०१९ ते १३ सप्टेंबर २०१९ या कालावधीत विविध धनादेशाद्वारे लक्षावधी रुपयांची उचल केली. सदर रक्कम बंडू बारापात्रे यांचे हस्तक अजय भोंगाडे व जगदीश वंजारी यांच्यामार्फत उचल करून फसवणूक केल्याच्या आरोप विजय खोब्रागडे यांनी केला आहे.
बँकेतील नोंदीवरून शेतकऱ्याच्या खात्यावर टाकलेली रक्कम परस्पर उचल केल्याचे दिसून येते. या आशयाची बाब बँक प्रशासनाला निदर्शनास आणून दिली; परंतु कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकाराची कायदेशीर चौकशी होऊन न्याय मिळावा याकरिता अन्यायग्रस्त शेतकरी खोब्रागडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रारीतून केली आहे.
कोट बॉक्स
सदर शेतजमिनीबाबत संपूर्ण व्यवहार पारदर्शकरीत्या करण्यात आला आहे. विजय खोब्रागडे यांनी लावलेले आरोप धादांत खोटे आहेत. जमिनीची रजिस्ट्री, सातबारा व फेरफार झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर त्यांनी हा आरोप लावणे म्हणजे कुठे तरी पाणी मुरत आहे. स्वतःचे पाप लपविण्यासाठी हा केलेला खोटा बिनबुडाचा आरोप आहे. न्यायालयामार्फत ‘दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी’ होईल. आम्ही कुठेही खोब्रागडे यांची फसवणूक केलेली नाही. उलट त्यांनीच आमची फसवणूक केली आहे. यासंदर्भात लाखनी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही. बंडू बारापात्रे, संचालक, बीटीबी सब्जी मंडी, भंडारा.