भंडारा : एका जीवन विमा कंपनीसाठी ग्राहकांकडून घेतलेल्या पैशाची कंपनी प्रतिनिधीने बनावट पावती देऊन तब्बल ६० लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पवनी तालुक्यातील कोंढा येथील बँक ऑफ इंडिया शाखेत उघडकीस आली. या प्रकरणी वरठी येथील एका तरुणाविरुद्ध अड्याळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रमीज राजा मुनीर शेख (३०, रा.शास्त्री वाॅर्ड आदर्शनगर, वरठी ता.मोहाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो स्टार युनियन दाई-ईची लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या गोंदिया कार्यालयांतर्गत कार्यरत होता. कोंढा येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तो ग्राहकांकडून विम्याचे पैसे स्वीकारत होता.
२१ जानेवारी, २०१९ ते १२ मे, २०१९ पर्यंत त्याने अनिल खापरीकर रा.आकोट, भारत मेश्राम रा.अत्री, लक्ष्मी देशमुख रा.आकोट यांच्याकडून रोख रक्कम एनईएफटीद्वारे घेतली. ही रक्कम ६० लाख ८ हजार ४२६ रुपये एवढी आहे. त्याने कंपनीच्या नावाने तयार केलेली बनावट पावती दिली. कंपनीचा प्रतिनिधी आणि तेही प्रतिष्ठित बँकेत बसून पावती देत असल्याने, कुणालाही याबद्दल सुरुवातीला संशय आला नाही. मात्र, काही दिवसांतच आपली फसवणूक झाल्याचे या तिघांच्या लक्षात आले. त्यांनी संबंधित कंपनीकडे धाव घेतली.
कंपनीच्या फ्राॅड कंट्रोल युनिटने याबद्दल चौकशी सुरू केली. त्यात रमीजने बनावट पावत्या देऊन ग्राहकांना गंडा घातल्याचे पुढे आले. अखेर नागपूर येथील कंपनीचे अधिकारी समीर इकराईल अब्दुल हमीद पांडे यांनी अड्याळ पोलीस ठाणे गाठले. रमीज विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. त्यावरून अड्याळ पोलिसांनी भादंवि ४२०, ४०८, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने रमीझकडे पैसे दिले. मात्र, त्याने बनावट पावत्या देऊन ग्राहकांना मोठा गंडा घातला. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा अनेक ग्राहकांना त्याने गंडा घातला असल्याचा संशय व्यक्त होत आहे.