युवराज गोमासे
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत आणि कर्मचारी वसाहती जीर्ण होऊन मोडकळीस आली आहे. त्यामुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकास राज्य सरकारने हिरवी झेंडी दाखविताच आरोग्य केंद्राची इमारत आणि कर्मचारी वसाहत बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकऱ्यांनी याला प्रशासकीय मान्यता दिली.
करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ४० वर्षे जुनी आहे. त्यामुळे इमारत केव्हाही कोसळण्याची भीती आहे. वसाहतीतील कर्मचारी शासकीय इमारतीत न राहता भाड्याने राहतात. तर अधिकारी शहरातून अपडाउन करतात. यासाठी करडी येथील जिल्हा परिषद माजी सदस्य नीलिमा इलमे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत व कर्मचारी वसाहत बांधकामासाठी वारंवार मागणी रेटून धरली. दीड वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये मुद्दा लावून धरताच त्यांच्या प्रयत्नाला यश आले.
ठराव प्राप्त होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंदाजपत्रक तयार करण्यात आले. राज्य ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाने निधी उपलब्धतेस मान्यता प्रदान केली. त्यावरून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांनी प्रशासकीय मंजुरीचा आदेश काढला. सुमारे सात कोटी ५० लाख ६७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून मुख्य प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कर्मचारी वसाहतीचे बांधकाम होणार आहे. रुग्णांना राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.