लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी तत्काळ द्यावा, रमाई आवास योजनेचा संपूर्ण निधी तीन टप्प्यात देण्यात यावा. प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी म्हाडामार्फत न देता थेट नगर पालिका व नगर पंचायतींना देण्यात यावा, यासह अन्य मागण्या महिनाभरात सोडविण्यात यावे, अन्यथा लाखनी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष धनु व्यास यांचे नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.जिल्ह्यातील इतर नगर पालिकांसह लाखनी नगर पंचायतलासुद्धा शेकडो गरजू, बेघर, गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांनी आवास योजनेअंतर्गत घरकुलसाठी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत घरकूल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी राज्य शासनाकडून एक लक्ष व केंद्र शासनाकडून दीड लक्ष रुपये असा एकूण अडीच लक्ष रुपयांचा निधी दिला जातो. राज्य शासनाकडून येणारा एक लक्ष रुपयांचा निधी दोन टप्प्यात त्वरित मिळत आहे. परंतु केंद्र शासनाकडून देण्यात येणारा दीड लक्ष रुपयांचा निधी घर बांधकाम पूर्ण होऊन वर्ष लोटूनही प्राप्त झालेला नाही. वर्षभरपूर्वी घराचे काम पूर्ण होऊनही केंद्र शासनाचा उर्वरीत निधी न मिळाल्याने अनेक लाभार्थ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे.शिष्टमंडळात शहर अध्यक्ष धनु व्यास, तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, नागेश पाटील वाघाये, अर्चना ढेंगे, सुनीता खेडीकर, नगरसेविका दीपाली जांभुळकर, सचिन भैसारे, दिनेश निर्वाण, मनोज पोहरकर, शशिकांत भोयर, प्रशांत मेश्राम, निलेश गाढवे, राजू शिवरकर, डोलिराम झंझाड, शत्रुघ्न टेंभूर्ने आदींचा समावेश होता.
अशा आहेत मागण्यारमाई आवास योजनेप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेतही ७/१२ व आखीव पत्रिकेची अट शिथिल करून गाव नमुना ८ च्या आधारे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात यावा. लाखनीतील इंदिरा नगर व संजय नगर येथील नागरिकांना जमिनीचे पट्टे मंजूर करून प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणी किंवा खरेदीसाठी मिळणारी कर्ज सुविधा सुरू करण्यात यावी. लाखनी नगर पंचायतमार्फत घरकुल योजनेचा डीपीआर तयार करणारी संस्था नऊ महिन्यापासून कार्यरत नाही, त्यामुळे शेकडो घरकुलचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. डीपीआर तयार करणाऱ्या संस्थेवर दंडात्मक कार्यवाही करावी.