धरण क्षेत्रात फलकाच्या समोरच केरकचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:17+5:302021-03-10T04:35:17+5:30
पर्यटकांवर वॉच नाही : स्वच्छतेला मूठमाती रंजीत चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या धरणावर पर्यटकांकरवी घाण ...
पर्यटकांवर वॉच नाही : स्वच्छतेला मूठमाती
रंजीत चिंचखेडे
चुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा नदीवर बांधकाम करण्यात आलेल्या धरणावर पर्यटकांकरवी घाण आणि केरकचरा फेकण्यात येत आहे. पर्यटकांना ताकीद देणाऱ्या फलकासमोरच कचरा फेकला जात आहे. हा प्रकार कवलेवाडा धरणावर निदर्शनास आलेला आहे; मात्र सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. यामुळे पर्यटकांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नाही.
सिहोरा परिसरातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर कवलेवाडा वांगी गावांचे शेजारी धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. धरणात पाणी अडविण्यात आल्याने विहंगम दृश्य निर्माण झाले आहे. यामुळे धरणावर पर्यटकांची हजेरी लावणे सुरू झाले आहे. या धरणाच्या शेजारी देवस्थान व खुले मैदान असल्याने पर्यटक कुटुंबीयांसोबत भेट देत आहेत. या स्थळावर चारचाकी, मोटरसायकलने पर्यटक येत असले तरी, वाहनांना पार्किंगमध्ये लावण्याचे नियोजन नाही. यामुळे वाहने सैरवैर उभे केले जात आहेत. धरणावर स्वच्छता ठेवण्यासाठी प्रशासनाने या आशयाचे फलक लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. धरणावरून धावणाऱ्या वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
याशिवाय अनुचित घटना कॅमेराबंद करण्यासाठी सीसी टीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; परंतु पर्यटक बेफिकीर असल्यागत वागत आहेत. नदीपात्रात जाण्याचे निर्बंध असताना सेल्फी काढण्यासाठी पर्यटक नदीच्या पात्रात जात आहेत. यामुळे जीव गमावण्याचे प्रकार घडले आहेत; परंतु पर्यटक ऐकायला तयार नाहीत. नदीकाठाचे गावालगत प्रतिबंधित फलक लावण्यात आले आहेत. जनावरे नदीपात्रात नेण्यावर बंदी घालण्यात आली असताना कुणी ऐकायला तयार नाहीत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून गावांचे नदीकाठ विकसित करण्यात आले नाही. पर्यटनाला चालना देणारी नवी संधी गावांना मिळाली आहे; परंतु लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे विकास तिथेच आटला आहे. यामुळे ग्राम पंचायतची उत्पन्नवाढ होत नाही. दरम्यान, शासनाने नदीकाठावरील गावात पर्यटनाला चालना देण्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट राबविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बॉक्स
तीर्थक्षेत्र विकसित करा
बपेरा गावांचे शेजारी गायखुरी देवस्थान, वैनगंगा बावणथडी नद्याचे संगम असून, भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. शिवरात्रीला यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. नदीपात्रात पाणी अडविण्यात आल्याने मनमोहक दृश्य निर्माण झाले आहे. बारमाही पाणी राहत असल्याने पर्यटकांची गर्दी राहत आहे. पर्यटन व तीर्थक्षेत्राचा संयुक्त संयोग निर्माण झालेला असून, लोकप्रतिनिधीच्या राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. शासनाने नद्याकाठावरील गावात मिनी ड्रीम प्रोजेक्ट राबविण्याची मागणी सरपंच ममता राऊत, गोंडीटोला ग्राम पंचायतच्या सदस्य शीतल चिंचखेडे, सुकली नकुलच्या सरपंच आंबेडारे, देवरी देवच्या सरपंच वैशाली पटले यांनी केली आहे.
कोट बॉक्स
देवरी देव, सुकली नकुल, बपेरा गावांचे नदी काठावर पर्यटन विकसित करण्याची गरज आहे. या गावातील नद्यांचे काठावर गायखुरी देवस्थान, माता बम्बलेश्वरी देवस्थान असून, ग्राम पंचायतचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पर्यटनाचा मिनी ड्रीम प्रोजेक्ट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
किशोर रांहगडाले, युवा नेते, भाजप, बपेरा.