भंडारा : : नवजात चिमुकल्यांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे कलेवर दुपारच्या वेळी गावात पोहोचले. निरागस चिमुकल्यांच्या निपचित देहाकडे पाहून कुटुंबातीलच नव्हे तर उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. चिमुकल्यांना अखेरचा निरोप द्यायची वेळ आली तेव्हा मातांचा ‘माझं बाळ मला द्या हो...’ हा आक्राेश हदय पिळवटून टाकणारा होता. कोणी कोणाचे सांत्वन करायचे, हा प्रश्न तेथे प्रत्येकालाच पडला होता.
माझी मुलगी मला आणून द्या हो...भंडारा : मुलीला जन्म दिला पण तिला अजूनही मनाप्रमाणे कवेत घेतले नव्हते. माझी मुलगी मला आणून द्या हो... असा टाहो भंडारा तालुक्यातील पहेलाजवळील श्रीनगर येथील रहिवासी योगिता विवेक धुळसे यांनी फोडताच उपस्थितांचे डोळे पाणावले. प्रकृती ठीक नसल्याने मुलीला एसएनसीयु कक्षात दाखल करण्यात आले होते. मुलगी मृत झाल्याचे वृत्त तिला देण्यात आले, तेव्हापासून तिच्या डोळ्यातून सारख्या धारा वाहत आहेत.
हुंदके देत चिमुकलीला दिला अखेरचा निराेपतुमसर : लग्नाला तीन वर्षे झाली, त्यानंतर कुंभरे दाम्पत्यांच्या घरी फुल उमलले. परंतु या जगात दाखल हाेताच अबाेल मुलीने जगाचा निराेप घेतला. पहिल्याच मुलीच्या मृत्यूने कुंभरे दाम्पत्यांवर दु:खाचा डाेंगर काेसळला. ‘आम्हाला आमची पाेरगी आणून द्या, असा हंबरडा तुमसर तालुक्यातील सिलेकसा (खापा) येथील आई कविता बारेलाल कुंभरे (२४) यांनी फोडला.
गीताने गमावले पहिलेच बाळभंडारा : वर्षभरापूर्वीच गीता आणि विश्वनाथचे लग्न झाले. वर्षभराच्या आत, म्हणजे १० नोव्हेंबर २०२० ला गीताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र जन्मतः तिचे वजन कमी असल्याने तिला एसएनसीयू वाॅर्डात हलविण्यात आले. भोजापुर येथील रहिवासी असलेल्या गीता विश्वनाथ बेहरे (२०) यांचे हे पहिलेच बाळ होते. ‘बाबूजी मेरी लडकी मुझे ला दो’ असे शब्द हुंदके देत ती बोलली, आणि गीता निःशब्द झाली.
कन्याजन्माचा आनंद दु:खात परावर्तितभंडारा : तालुक्यातील रावणवाडी येथील रहिवासी वंदना मोहन सिडाम यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पहिली मुलगी असली तरी दुसरे अपत्यही अत्यंत आनंदात स्वीकारत त्याचा जल्लोष करण्याचे त्यांनी ठरविले होते. लोकमत प्रतिनिधीजवळ वंदनाने आक्रोश आणि आसवांना वाट मोकळी करून दिली. जन्मताच वजन कमी असल्याने मुलीला एसएनसीयु कक्षात हलविण्यात आले होते. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र या दुर्घटनेने वंदना यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. संपूर्ण कुटुंबच दु:खात बुडाले.
नऊ दिवसांच्या मुलीचा दोष होता तरी काय?मोहाडी : नऊ दिवसांपूर्वीच तिला जन्म दिला. दिसायला अत्यंत सुंदर. अशक्त असल्याने तिला एसएनसीयू कक्षात दाखल केले होते. मात्र ती मला अशी पुन्हा परत मिळेल, असा मी स्वप्नातही विचार करू शकत नाही. नऊ दिवसांच्या मुलीचा काय दोष होता, असे बोलत दुर्गा विशाल रहांगडाले (टाकला, ता. मोहाडी) या मातेने आसवांना वाट मोकळी करून दिली.