२७ लोक २४
लाखांदूर : गत ५० वर्षांपूर्वीपासून शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून घरांचे बांधकाम करीत निवासी सोयीने राहणारे अनेक कुटुंब शासन योजनांपासून वंचित असल्याचा आरोप करीत संबंधित अतिक्रमणधारक कुटुंबांना मालकी पट्टे देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी तालुक्यातील बेलाटी येथील काही अतिक्रमणधारक कुटुंबांच्या समर्थनार्थ लाखांदूर तालुका प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने लाखांदूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
तालुक्यातील बेलाटी येथील शासकीय जमीन गट क्र. ५३७ मधील शासकीय अनेक भूखंडांवर गत ५० वर्षांपूर्वीपासून काही कुटुंब अतिक्रमित घरात कुटुंबासह वास्तव्यास आहेत. या अतिक्रमित घरात कुटुंबासह निवासी सोयीने वास्तव्यास असताना येथील ग्रामपंचायत अभिलेखात कराची नोंददेखील करण्यात आली आहे. मात्र, या घरांच्या जमिनीचे मालकीपट्टे नसल्याने हे कुटुंब शासनाच्या विविध योजनांसह निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारीपासून वंचित आहेत.
यासंबंध गैरसोयींची दखल घेत शासनाने तालुक्यातील बेलाटी येथील कुटुंबांना मालकीपट्टे देण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. लाखांदूरचे तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांना निवेदन देताना प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख धनराज हटवार, तालुका युवा प्रमुख अविश शेंडे, बेलाटी शाखाप्रमुख अरविंद राऊत, जनसंपर्क प्रमुख खेमराज भुते यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.