भंडारा जिल्ह्यातील ७७ वर्षीय आजोबांची सुवर्ण कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 06:57 PM2021-09-22T18:57:34+5:302021-09-22T18:59:40+5:30
Bhandara News चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती असेल तर काेणतीही गोष्ट अशक्य नाही. मग त्यासाठी वयही आडवे येत नाही. लाखनी तालुक्यातील ७७ वर्षीय आजोबांची देदीप्यमान कामगिरी बघून आश्चर्याने डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत.
भंडारा : चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास आणि खेळाडूवृत्ती असेल तर काेणतीही गोष्ट अशक्य नाही. मग त्यासाठी वयही आडवे येत नाही. लाखनी तालुक्यातील ७७ वर्षीय आजोबांची देदीप्यमान कामगिरी बघून आश्चर्याने डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाहीत. या आजोबांनी गोवा येथे झालेली ऑल इंडिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धा जिंकली आणि स्पेनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. तरुणांनाही लाजविणाऱ्या या आजोबांचे नाव आहे सुदाम शहारे. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत.
तालुक्यातील पोहरा येथे राहणाऱ्या डॉ. सुदाम शहारे यांनी गोवा येथे झालेल्या ऑल इंडिया बॅडमिंटन मास्टर स्पर्धेत साठ वर्षांवरील गटात भाग घेतला. २१ सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत देशातील चार स्पर्धकांना हरवून त्यांनी विजय प्राप्त केला. जिल्ह्यासह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. आता नोव्हेंबर महिन्यात स्पेन येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. एकेकाळी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून राजकीय कारकीर्द गाजविली होती. डॉ. शहारे रोज लाखनी येथील क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्टात प्रॅक्टिस करतात. एक तास पोहण्याचा आनंद घेतात. विभागीय व जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करून तरुणांना प्रोत्साहन देतात. यापूर्वीही त्यांनी अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत.
प्रोत्साहन देण्यासाठी गावकरी थेट गोव्यात
आपल्या गावातील आजोबा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे पोहरा येथे गावकऱ्यांना कळताच त्यांनी गावाचे सरपंच रामलाल पाटणकर व मंगेश मेश्राम यांच्या पुढाकारातून थेट गोव्याची तयारी केली. गावकऱ्यांनी डॉक्टरांना प्रोत्साहन दिले. विजयानंतर गोव्यात जल्लोष साजरा केला. डॉक्टरांची कामगिरी आमच्या पोहरा गावच्या इतिहासात घडलेली ऐतिहासिक घटना आहे, असे सरपंच रामलाल पाटणकर अभिमानाने सांगतात.