गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणूक; पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसची आगेकूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:44 AM2018-05-31T10:44:05+5:302018-05-31T10:44:05+5:30
भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी १८,०२८ मतांची आघाडी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा- भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांनी १८,०२८ मतांची आघाडी घेतली आहे. तर भाजपचे हेमंत पटले यांना १७, २४६ मते मिळाली आहेत. हाती आलेल्या बातम्यांनुसार दुसऱ्या व तिसऱ्या फेरीतही राष्ट्रवादी पुढे असून सध्या चौथ्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
पहिल्या फेरीतील मतमोजणीत अक्षय पांडे १९५ (विदर्भ माझा पार्टी), गोपाल उईके १५० (गोंडवाना गणतंत्र पार्टी), डॉ.चंद्रमणी कांबळे- १०१ (आंबेडकर पार्टी आॅफ इंडिया), जितेंद्र राऊत- ५४ (अखिल भारतीय मानवता पार्टी), धरमराज भलावी- १३९ (बहुजन मुक्ती पार्टी), नंदलाल काडगाये- १२० (बळीराजा पार्टी), राजेश बोरकर-११९ (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), एल.के.मडावी-७७८ (भारिप बहुजन महासंघ), अजबलाल तुलाराम- ३३३ (अपक्ष), किशोर पंचभाई- ४९ (अपक्ष), काशीराम गजबे- ४४५ (अपक्ष), चनीराम मेश्राम- ६८ (अपक्ष), पुरुषोत्तम कावळे- १४२ (अपक्ष), राकेश टेभरे- ३२९ (अपक्ष), रामविलास मस्करे- ४४८ (अपक्ष), सुहास फुंडे-. ३५६ (अपक्ष) अशी मते पडली आहेत.
गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे दि. २८ मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. नाना पटोले यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यावर या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. दरम्यान, ईव्हीएममधील बिघाडामुळे बुधवारी (३0 मे) भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील ४९ बुथवर फेरमतदान घेण्यात आले. यावेळेस, गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले, असा ठपका ठेऊन त्यांची ताबडतोब बदली करण्यात यावी, असेही आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने काळे यांची लगेच बदलीही केली. मात्र, काळे यांच्याकडून कर्तव्यात काय कसूर झाली, हे मात्र आयोगानं स्पष्ट केलेले नाही.