‘गोसेखुर्द’ 372 कोटींवरुन 18 हजार कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:00 AM2021-03-04T05:00:00+5:302021-03-04T10:30:52+5:30

 भंडारा जिल्ह्यात जलस्रोतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. वैनगंगासह तिच्या तीन उपनद्याही आहेत.  याच आधारावर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सिंचन व्यवस्थेअंतर्गत प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसी खुर्द प्रकल्पाची मुहूर्तमेढ चार दशकांपूर्वी रोवण्यात आली. मात्र चार दशकानंतरही हा  प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. अजूनही पुनर्वसनाची कामे रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. जमीन, घरांचा  मोबदलाही अनेकांना मिळायचा आहे.

Gosekhurd from Rs 372 crore to Rs 18,000 crore | ‘गोसेखुर्द’ 372 कोटींवरुन 18 हजार कोटींवर

‘गोसेखुर्द’ 372 कोटींवरुन 18 हजार कोटींवर

Next
ठळक मुद्देनिधीची प्रतीक्षा : कालव्यांची कामे अपुर्ण, पुनर्वसनाचाही प्रश्न कायम

इंद्रपाल कटकवार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :  विदर्भातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पवनी तालुक्यातील गोसी खुर्द प्रकल्पाला आता पूर्णत्वास नेण्यासाठी १८ हजार कोटींची गरज आहे. सुरुवातीला ३७४ कोटी रुपयांच्या भूमिपूजनपासून सुरुवात झालेला हा प्रकल्प हजारो कोटींपर्यंत पोहोचल्याने परिसरातील शेतकऱ्यांना हव्या त्याप्रमाणे सिंचनाची सुविधा उपलब्ध झालेली नाही.
 भंडारा जिल्ह्यात जलस्रोतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. वैनगंगासह तिच्या तीन उपनद्याही आहेत.  याच आधारावर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सिंचन व्यवस्थेअंतर्गत प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसी खुर्द प्रकल्पाची मुहूर्तमेढ चार दशकांपूर्वी रोवण्यात आली. मात्र चार दशकानंतरही हा  प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. अजूनही पुनर्वसनाची कामे रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. जमीन, घरांचा  मोबदलाही अनेकांना मिळायचा आहे.  विशेष म्हणजे अनेक ठिकाणी कालवे व त्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळू शकलेला नाही. यावर निर्णय होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

भीमलकसा प्रकल्प 
 साकोली तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याची क्षमता असलेला भीमलकसा प्रकल्प तीन दशकांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. हा सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास साकोली व अन्य तालुका लागलेल्या परिसरातही या प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो. मात्र हाही प्रकल्प  पूर्णत्वास जाऊ शकला नाही, हीच साकोली तालुक्‍याची खरी शोकांतिका म्हणावी लागेल.

निम्न चूलबंद प्रकल्प
 साकोली तालुक्यातील महत्त्वकांक्षी दुसरा प्रकल्प म्हणजे निम्न चूलबंद प्रकल्प.  चूलबंद नदीवर आधारलेला हा प्रकल्प अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. लहानमोठी कामे अजूनही रखडलेली आहे. अपूर्णत्व कामामुळे शेतकऱ्यांना सिंचन घेण्यास अडचण निर्माण होत आहे. हा प्रकल्पही निधी वाढल्यामुळे रखडलेला आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यानेच प्रकल्प रखडला आहे.

करचखेडा उपसा सिंचन 
 भंडारा तालुकांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीपात्रात उभारण्यात आलेल्या करचखेडा  सिंचन प्रकल्पही अजूनही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही. या प्रकल्पांतर्गत कालव्याची कामे व अन्य तांत्रिक कामे रखडलेली आहेत. या प्रकल्पालाही निधीचा फटका बसला असून, ही कामे पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्य शासनाने सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आम्हाला सिंचन सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
-शरद भुते, शेतकरी खुटसावरी 

साकोली तालुक्यातील निम्न चूलबंद प्रकल्प पूर्णत्वास गेला असता तर आज खऱ्या अर्थाने त्याचा लाभ झाला असता. मात्र हा प्रकल्पही पूर्ण होऊ शकला नाही.
-यादोराव नंदेश्वर, शेतकरी, पिंडकेपार

टप्प्याटप्प्याने का होईना शासनाने प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून द्यायला हवा. मात्र अनुदानाची रक्कम मिळायला वर्ष-वर्ष लागत असतील तर सिंचन प्रकल्पासाठी निधी कुठून येणार.
- प्रभू साखरे, शेतकरी दवडीपार बा.

अन्य प्रकल्पांची दुरवस्था  
 जिल्ह्यात अनेक लहान-मोठे प्रकल्प निधीअभावी तर काही ठिकाणी तांत्रिक कारणांनी रखडले आहेत. यात बावनथडी प्रकल्प, काळा गोटा प्रकल्प, नेरला उपसा सिंचन योजना यासह अनेक प्रकल्प थंडबस्त्यात आहेत. अनेक ठिकाणी कालव्यांची व पाटांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

 

Web Title: Gosekhurd from Rs 372 crore to Rs 18,000 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.