ज्ञानेश्वर मुंदेभंडारा :
‘धरणात ११ एकर वावर गेले. पैसे भेटले अन् संपलेही. तरी घरासाठी जागा भेटली नाही. लग्नाच्या पोरी झाल्या. त्यांना बघण्यासाठी पोरगं येतं. आलेल्या पावण्यायले बसवाले घरात जागा नाय. घरात ओल आणि छपरावर ताडपत्री पाहून पोरीले पोरगा पसंतच करत नाही. आता पोरीची सोयरीक कसी होईनजी?’ ही व्यथा आहे गोसे प्रकल्पाने बाधित आणि पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांची.
भंडारा तालुक्यातील पिंडकेपार टोलीच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रशासनाच्या लालफितीत अडकला आहे. १९६२ साली वैनगंगा नदीला पूर आला. तेव्हा मूळ गावातील ५४ घरांचे टोलीवर पुनर्वसन झाले. त्यानंतर गोसे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गाव आले. शेती पाण्याखाली गेली; पण टोलीचे पुनर्वसन झालेच नाही. गत दहा वर्षांपासून प्रशासनाची टोलवाटोलवी सुरू आहे. गाव पुनर्वसनात असल्याने कोणत्या सुविधाही मिळत नाहीत. दरवर्षी येणाऱ्या पुराने आणि बॅकवॉटरने घरांची अवस्था दयनीय झाली आहे.
रेशनचा भात, तो धके नाहीधरणात शेत जायच्या आधी आम्ही सुखी होतो. शेतात धान पिकत होते. घरी सुबत्ता होती. आता सर्व धरणात गेले, मजुरी करण्याची वेळ आली. घरात खाण्यासाठी रेशनचे तांदूळ आणावे लागते. कधी असा भात खाल्ला नाही, तो धके नाही (घशाखाली उतरत नाही). गोसेत शेती गेली अन् ही कंडिशन आली, अशी व्यथा इंदिराबाईंनी मांडली.
भाऊरावच्या घराला ‘टेकू’भाऊराव बाबरे यांचे घर पडायला आले आहे; पण घर बांधायला परवानगी नाही. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने जीव मुठीत घेऊन त्याच घरात कुटुंबासह ते राहत आहेत. संपूर्ण घरात ओल असल्याने चटई अंथरावी लागते. घरात पाच फुटांपर्यंत ओल आहे. घरावर ताडपत्री टाकून भिंतीला टेकूचा आधार दिला आहे.
पावसाळा संपून हिवाळा लागला तरी घरात ओल आहे. भिंती ढासळत आहेत. पावसाळ्यात कवेलूच्या छपरावर ताडपत्री टाकून रहावे लागते. आमची १२ एकर शेतीपैकी धरणात ११ एकर गेली. आता एक एकरातील पिकावर जगावे लागते. मुलगी बीएस्सी झाली. मुलगा बारावीला आहे. मुलीच्या लग्नाची चिंता आहे. असे घर पाहून आमच्यासोबत कोण सोयरीक करणार?- इंदिराबाई साठवणे
घरात दोन जनावरे बांधायला जागा नाही. घरात ओल असते. रात्री साप, विंचवाची भीती असते. आम्ही येथून जायला तयार आहो; पण सरकार काही करायला तयार नाही.- आशा वंजारीघर पडत आहे, तरी मदत मिळत नाही. इतर गावात मदत मिळते, आम्ही काय गुन्हा केला? - शोभा मते