ग्रामसेवकावर हल्ला
By admin | Published: June 9, 2017 12:44 AM2017-06-09T00:44:23+5:302017-06-09T00:44:23+5:30
तालुक्यातील इसापूर येथील ग्रामसचिव दत्ता पोहरकर यांच्यावर सुनील चाफले यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याने पोहरकर यांना ...
संघटनेने केला निषेध : कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील इसापूर येथील ग्रामसचिव दत्ता पोहरकर यांच्यावर सुनील चाफले यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याने पोहरकर यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयातून भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुरमाडी तुपकरचे तत्कालीन ग्रामसेवक दत्ता पोहरकर व सरपंच यांनी शासकीय निधीची अफरातफर केला, असा आरोप करून ग्रामपंचायत सदस्य सुनिल चाफले यांनी सदर प्रकल्पाचा पाठपुरावा केला होता. तपासात काहीही निष्पन्न न झाल्याने चाफले यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना आत्मदहनाची धमकी देवून पोहरकर यांचे निलंबन करण्यात भाग पाडले. त्यानुसार दत्ता पोहरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तहसिल कार्यालयासमोर ग्रामसेवक पोहरकर यांना चाफले दिसले त्यांनी पोहरकर यांना शिवीगाळ केली व काठीने मारायला सुरवात केली. त्यांना डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हात फॅक्चर झाला आहे.
सदर घटनेची तक्रार लाखनी पोलीस स्टेशन येथे केली आहे. गुन्हा नोंदविण्यात आला आहे. चाफले यांनी ग्रामसेवक पोहरकर व सरपंच यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून वारंवार पैशाची मागणी करायचे. चाफले यांनी ग्रामपंचायतच्या जागेत अवैध बांधकाम केले होते. मुरमाडी येथील एका राजकीय नेत्याने घरटॅक्स देण्यास टाळाटाळ केली होती. त्या नेत्याकडून टॅक्स वसूल केल्यामुळे ते ग्रामसेवक पोहरकर यांच्यावर नाराज होते. चाफले यांनी प्रामाणिक ग्रामसेवक पोहरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यामुळे ग्रामसेवक व कर्मचारी संघटनांनी निषेध केला आहे.
यापुर्वी मारहाणीत सुनील चाफले यांना मारहाण केल्यामुळे गंभीर जखमी झाले, अशी तक्रार चाफले यांनी केली होती. दत्ता पोहरकर व चाफले यांनी एकमेकांविरुध्द तक्रारी केल्यामुळे पोलीस तपास महत्वाचा ठरणार आहे.