125 दुकानांच्या अतिक्रमणावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:00 AM2021-02-28T05:00:00+5:302021-02-28T05:00:00+5:30
भंडारा शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अगदी रस्त्यावर दुकान थाटून व्यवसाय केला जातो. तर काही दुकानदारांनी आपल्या पक्क्या दुकानासमोर पत्रे टाकून अतिक्रमण केले आहे. यामुळे शहरातील वाहतूक समस्या बिकट झाली होती. नागरिकांनाही याचा त्रास होत होता. यासाठीच नगर परिषदेने शुक्रवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील विविध भागात वाढलेल्या अतिक्रमणावर अखेर नगर परिषदेचा हातोडा चालला. दोन दिवसात १२५ दुकानांचे लहान मोठे अतिक्रमण जेसीबीने हटविण्यात आले तर सात हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली. या मोहिमेने अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भंडारा शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अगदी रस्त्यावर दुकान थाटून व्यवसाय केला जातो. तर काही दुकानदारांनी आपल्या पक्क्या दुकानासमोर पत्रे टाकून अतिक्रमण केले आहे. यामुळे शहरातील वाहतूक समस्या बिकट झाली होती. नागरिकांनाही याचा त्रास होत होता. यासाठीच नगर परिषदेने शुक्रवारपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली.
नगर परिषदेचे पथक, पोलिसांचा ताफा आणि जेसीबीच्या मदतीने अतिक्रमण काढण्यात आले. शहरातील गांधी चौक ते पोस्ट ऑफिस, मुख्य बाजारपेठ, मोठा बाजार, मटन मार्केट, सब्जी मंडी, मुस्लिम लायब्ररी चौक या भागातील अतिक्रमण हटविण्यात आले. शनिवारीही शहरातील विविध भागातील अतिक्रमण काढण्यात आले. अनेकांनी नालीवर बांधकाम केले होते तेही जेसीबीच्या मदतीने तोडण्यात आले.
या मोहिमेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, उपमुख्याधिकारी अश्विनी चव्हाण, कनिष्ठ अभियंता धनश्री वंजारी, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता पाटील, नगररचनाकार विभागाचे निखील कांबळी, अनिकेत दुरूगवाडे, मिथून मेश्राम, कनिष्ठ अभियंता प्रशांत गणवीर, परमसिंग राठोड, राहुल देशमुख, संग्राम कटकवार, मंटू मोगरे, राहुल कटकवार, पदमकुमार संदेश, जसपाल सोनेकर सहभागी झाले होते. यासोबतच भंडारा शहर पोलिसांचा ताफा मदतीला होता.
नगर परिषदेचे पथक अतिक्रमण काढण्यासाठी धडकताच अनेक व्यापाऱ्यांची मोठी धांदल उडाली. अनेकांनी स्वत:हूनच अतिक्रमण काढून टाकले. मात्र अतिक्रमण हटाव मोहीम औटघटकेची न ठरता ती कायमस्वरूपी रहावी, अशी मागणी शहरवासीयांची आहे. शहरातील अतिक्रमणावर कायमस्वरूपी तोडघा निघत नाही तोपर्यंत अशा मोहीमा केवळ औटघटकेच्या ठरतात.
कोरोनात लहान व्यावसायिक हतबल
कोरोनामुळे रोजगार गेलेल्या अनेकांनी शहरातील विविध भागात फुटपाथवर आपला व्यवसाय सुरू केला आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना कुटुंब चालविण्यासाठी ही मंडळी व्यवसाय करीत आहे. कोरोना संकटामुळे आजही त्यांच्यावर संकट कायम आहे. अशा स्थितीत अतिक्रमण हटाव मोहिमेत अनेकांची दुकाने हटविण्यात आली. त्यामुळे त्यांच्यापुढे पुन्हा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. फुटपाथवरील विक्रेत्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी आणि नगर परिषदेने बांधलेले गाळे त्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.
भंडारा नगर परिषदेच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. अतिक्रमण हटविण्यासंदर्भात सूचना देण्यात आली होती. त्यानंतरही अनेकांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे नाईलाजाने अतिक्रमण काढावे लागले. नागरिकांनी अतिक्रमण हटाव मोहिमेला सहकार्य करावे.
-विनोद जाधव, मुख्याधिकारी, नगर परिषद, भंडारा.