लाखांदूर : श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री क्षेत्र चारभट्टी हनुमान देवस्थान येथे मागील १५ वर्षापासून हनुमान चालिसा पाठ कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. ही परंपरा या क्षेत्राचे आमदार असतापासून खासदार नाना पटोले यांनी सुरू केली होती. ही परंपरा आजही कायम आहे. आज मंगळवारला हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचे पठन करण्यात आले. दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या शनिवारला श्री क्षेत्र चारभट्टी येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठन करण्यात येते. परंतु शेवटच्या शनिवारला पोळा आल्यामुळे हा कार्यक्रम मंगळवारला घेण्यात आला. या कार्यक्रमाला अर्जुनी, मोरगाव, लाखांदूर, पवनी, साकोली, गोंदिया येथील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार पटोले म्हणाले, या भागातील सर्वसामान्यांच्या समस्या व विकास कामासाठी हनुमान चरणी प्रार्थना करणे हा त्यामागचा उद्देश असून मागील सरकारने जागतिक वर्ल्ड बँकेतून घेतलेला पैसा हा विविध शासकीय योजनासाठी मिळाला असताना प्रशासनाचे दुर्लक्ष व नियोजनशून्य कारभारामुळे सुविधा सर्वसामान्यापर्यंत पोहचले नाही. केंद्र आणि राज्यातील सरकारने यामध्ये सुधारणा करून यात प्रशासनाचा कसलाही सहभाग न ठेवता लोकप्रतिनिधी व जनतेच्या सहकार्याने प्रलंबित कामे करण्यात येणार असल्याचे खा.पटोले यांनी सांगितले.गोंदिया जिल्ह्यात ३४ शेतकऱ्यांनी तर भंडारा जिल्ह्यात १९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद शासन दरबारी असून ही चिंतेची बाब आहे. संपूर्ण केंद्र व राज्य सरकारच्या योजना या सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नमुना अर्ज हे गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून भरून घेण्यासाठी पावले उचलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला दिनेशानंद महाराज, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद पटोले, नरेश खरकाटे, विनोद ठाकरे, प्रल्हाद देशमुख, रज्जू पठाण, रामचंद्र राऊत, भरत खंडाईत, राजू कोट्टेवार, प्रमोद लांजेवार, विजय राठोड, गजानन डोंगरवार, नामदेव कापगते, प्रकाश गहाणे, विरेंद्र जैस्वाल, मुकेश जैस्वाल, मंदा कुंभरे, नवीन नशीने, अशोक चांडक, मोरेश्वर बोरकर, शैलेश मुल, प्रकाश राऊत, शिवाजी देशकर, रामचंद्र राऊत उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र चारभट्टी येथे हनुमान चालिसा पाठ
By admin | Published: September 09, 2015 12:42 AM