जिल्ह्यात जाेरदार पाऊस, गाेसेचे सर्व 33 दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 05:00 AM2021-09-22T05:00:00+5:302021-09-22T05:00:20+5:30
गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी ११ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले हाेते. त्यात २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हाेते. ५१२३.११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात हाेता. मात्र सकाळी पडलेल्या पावसाने पाणीपातळी वाढल्याने सायंकाळी ५ वाजता सर्व ३३ गेट एक मीटरने उघडण्यात आले. ७२९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा / माेहाडी : जिल्ह्यात मंगळवारी पावसाने जाेरदार हजेरी लावल्याने एकच तारांबळ उडाली. गाेसेखुर्द प्रकल्पाच्या जलपातळीत वाढ झाल्याने सर्व ३३ दरवाजे एक मीटर उघडण्यात आले. वैनगंगा दुथडी भरून वाहत आहे. माेहाडी तालुक्यात अतिवृष्टीची नाेंद झाली असून, अवघ्या तीन तासांत ६५ मिमी पाऊस काेसळला. अनेक घरांत पाणी शिरले असून धान शेतीही जलमय झाल्याचे चित्र आहे.
गत दाेन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस काेसळत आहे. साेमवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर पाऊस काेसळला. मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात २९.८ मिमी पावसाची नाेंद झाली. त्यात पवनी तालुक्यात ६०.८ मिमी आणि भंडारा तालुक्यात ५२.१ मिमी पावसाचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. माेहाडी तालुक्यात जाेरदार पाऊस बरसला. माेहाडी तालुक्यातील सीतेपार तलाव ओव्हरफ्लाे हाेऊन या तलावाचे पाणी धानाच्या शेतीत शिरले. तसेच अनेक गावांतील सकल भागातील घरात पाणी शिरले.
गाेसेखुर्द प्रकल्पाच्या पाणलाेट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने धरणाची पाणीपातळी कायम राखण्यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी ११ वाजता सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले हाेते. त्यात २० दरवाजे अर्धा मीटरने तर १३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हाेते. ५१२३.११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात हाेता. मात्र सकाळी पडलेल्या पावसाने पाणीपातळी वाढल्याने सायंकाळी ५ वाजता सर्व ३३ गेट एक मीटरने उघडण्यात आले. ७२९३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. भंडारा शहरानजीक वाहणाऱ्या वैनगंगा नदीची पाणी पातळी स्थिर असून, सध्या कारधा येथे २४४.६७ मीटर पाणी असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला.
मोहाडीत घरांची पडझड
- मोहाडी तालुक्यासह शहरात मंगळवारी सकाळी दोन तास मुसळधार बरसल्याने अनेक घरात पाणी शिरले तर काही घरांची पडझड झाली. दोन तासांत ६५ मिमीच्यावर पाऊस पडला. सखल भागात असलेल्या कुशारी फाटा चौकात जवळपास दोन फूट पाणी रस्त्यावर साचले होते. वाहनांना जागेवरच उभे रहावे लागले. तहसील कार्यालयातही पाणी शिरले. तहसीलदारांनी तलाठ्यांची तातडीची बैठक बोलावून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. सीतेपार तलावाचे पाणी गावात शिरले तर हरदोली येथील तलावाच्या पारीला खिंडार पडले. मोहाडी, कान्हळगाव, हरदोली या गावांना पावसाचा मोठा फटका बसला.