बोटीच्या साहाय्याने तीन किलोमीटर परिसर पिंजून हातभट्टीवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:36+5:302021-05-18T04:36:36+5:30
भंडारा : वैनगंगेच्या विशाल पात्रात एका बेटावर हातभट्टी कारखाना असल्याची माहिती मिळाली. छापा टाकण्याची तयारी केली, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचा ...
भंडारा : वैनगंगेच्या विशाल पात्रात एका बेटावर हातभट्टी कारखाना असल्याची माहिती मिळाली. छापा टाकण्याची तयारी केली, परंतु तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रश्न होता. जिल्हा प्रशासनाची बोट मिळविली. या बोटीच्या साहाय्याने तीन किलोमीटरचा परिसर पिंजून करचखेडा बेटावर हातभट्टी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. तब्बल चार तास चाललेल्या या कारवाईत जिवाची पर्वा न करता स्थानिक गुन्हे शाखा आणि कारधा पोलिसांनी कामगिरी केली. पहिल्यांदाचा मोठ्या प्रमाणात मोहामाच नष्ट करण्यात आला.
भंडारा शहरालगत वाहणाऱ्या वैनगंगा नदीत अनेक बेट निर्माण झाले आहेत. या बेटावर मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपी वनस्पती वाढली आहे. याचा फायदा घेत तेथे हातभट्टीची दारू गाळली जाते. दारू गाळणारे लहान बोटीच्या मदतीने तेथे दारू गाळतात आणि त्याची विक्री करतात. पोलिसांना हा प्रकार माहीत झाला. परंतु, तेथपर्यंत छापा टाकायचा कशा असा प्रश्न होता. शेवटी कारधाचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. प्रशासनाकडून बोट मिळवून देण्याची विनंती केली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचेही साहाय्य घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून बोट मिळाली. त्यात २००० रुपयांचे पेट्रोल टाकण्यात आले. बोट चालविणाऱ्या दोघांची मदत घेण्यात आली. तसेच एक ट्रॅक्टरही भाड्याने घेण्यात आले. शनिवारी दुपारी ३ वाजता वैनगंगा नदीच्या पात्रात बोट सोडली. तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी बोटीने बेटापर्यंत पोहोचले. परंतु, त्या ठिकाणी वाढलेले गवत आणि झुडपी वनस्पतींमुळे बेटावर उतरणे कठीण जात होते. अशा परिस्थितीत जिवाची पर्वा न करता पोलिसांनी या बेटावर पाय ठेवला. पोलिसांना पाहताच छोट्या डोंग्याने तीन महिला आणि चार पुरुष असे सातजण पसार झाले.
पोलिसांनी बेटावर शोधमोहीम घेतली असता ८० किलो क्षमतेचे मोठाले माठ आणि त्यामध्ये मोहा सडवा आढळून आला. २०० मातीच्या मडक्यांतही सडवा ठेवलेला होता. प्लास्टिक पिशव्यांमध्ये अडीच क्विंटल सडवा दिसून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल नष्ट केला. तब्बल चार तास चाललेली ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण, कारधाचे ठाणेदार दीपक वानखेडे यांच्यासह पथकाने केली.
बाॅक्स
दारू कडक होण्यासाठी रसायनांचा वापर
संचारबंदीच्या काळात गावठी दारूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या तुलनेत दारूची निर्मिती होत नाही. त्यामुळे दारू गाळणाऱ्यांनी आता दारू कडक करण्यासाठी विषारी रसायनांचा वापर सुरू केला आहे. नवसागर यासोबत विविध रासायनिक पदार्थ टाकून दारू कडक केली जाते. मात्र, ही दारू सातत्याने प्राशन केली तर किडनी, लिव्हर निकामी होण्यासोबतच विविध आजार होऊ शकतात.
कोट
नियोजनबद्ध पद्धतीने करचखेडा घाटावर छापा टाकण्यात आला. मोठ्या प्रमाणात मोहामाच उद्ध्वस्त करण्यात आला. आता दर दहा - पंधरा दिवसांनी दारू अड्ड्यांवर कारवाई करण्याचे नियोजन आहे.
- जयवंत चव्हाण, प्रमुख एलसीबी, भंडारा.