सिहोरात घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:27+5:30
लाभार्थी घरकुलांचे बांधकाम करीत असताना उसनवारीचा आधार घेत आहेत. बांधकाम साहित्य विक्रेते उधारीने सामान देत नाहीत. रेती, विटा, सिमेंट आणि लोखंड खरेदी करताना नगदी व्यवहार करावा लागत असून याकरिता निधीची जुळवा जुळव केली जात आहे. अल्प कालावधी करिता निधीची जमवा जमव केल्यानंतर अनुदान प्राप्ती करिता विलंब होत असताना प्रचंड मनसताप सहन करण्याची वेळ या लाभार्थ्यावर येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : रमाई आवास योजने अंतर्गत सिहोरा परिसरातील घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान मिळाले नसल्याने अर्धवट बांधकाम असणाऱ्या घरकुलातच लाभार्थ्यांना वास्तव्य करण्याची वेळ आली आहे. यामुळे घरकुल लाभार्थ्यात असंतोष पसरला आहे.
सिहोरा परिसरातील प्रत्येक गावात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे. परंतु गरीब, गरजु लाभार्थ्यांना योजने अंतर्गत हक्काचा निवारा देण्याचा प्रयत्न झाला असला तरी या योजनेमुळे घरकुल लाभार्थी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. घरकुल योजनेत शासन स्तरावर प्रथम आणि द्वितीय हप्त्याची राशी जलद गतीने देण्यात येत आहे. यानंतर निधी देताना आखडला जात आहे.
लाभार्थी घरकुलांचे बांधकाम करीत असताना उसनवारीचा आधार घेत आहेत. बांधकाम साहित्य विक्रेते उधारीने सामान देत नाहीत.
रेती, विटा, सिमेंट आणि लोखंड खरेदी करताना नगदी व्यवहार करावा लागत असून याकरिता निधीची जुळवा जुळव केली जात आहे. अल्प कालावधी करिता निधीची जमवा जमव केल्यानंतर अनुदान प्राप्ती करिता विलंब होत असताना प्रचंड मनसताप सहन करण्याची वेळ या लाभार्थ्यावर येत आहे. लाकडाऊनपासून अनेकांना अनुदानाची राशी प्राप्त झालेली नाही. अनेक लाभार्थ्यांची अंतिम हप्त्याची अनुदान राशी थकीत आहे.
या परिसरातील गावात अनेक लाभार्थ्यांचे घरकुलाचे छत अर्धवट आहेत. ताडपत्रीचा आधार देवून त्याचे वाटचाल सुरू आहे. पावसाळ्यात या घरकुल लाभार्थ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. परंतु घरकुलाचे पुर्णत्वाकरिता शासनाकडून अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे गरीबाचे घरकुल स्वप्न भंगत होताना दिसून येत आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादूर्भाव वाढल्याने लाभार्थी गाºहाणे सांगण्याकरिता पंचायत समिती स्तरावर जावू शकत नाही. त्यांची व्यथा कुणी ऐकायला तयार नाही. त्यामुळे न्याय मिळत नाही.
गरीब आणि सामान्य जनतेला न्यायाकरिता पंचायत समितीत हेलपाटे मारावे लागत आहे. रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाची राशी मिळाली नसल्याने डोळ्यात अश्रू येत आहेत. अर्धवट घरात आयुष्य घालवण्याची वेळ आली आहे. शासन स्तरावर दखल घेण्याची मागणी आहे.
घरकुलांचा वाढता अनुशेष
गोंडीटोला गावात गोवारी समाज बांधवांना प्रधानमंत्री आवास योजनेचा बोटावर मोजण्या इतपत लाभ मिळाला आहे. २०-२५ पात्र लाभार्थी वंचित आहेत. त्यांना न्याय देण्याकरिता सामाजक कार्यकर्ते किशोर रहांगडाले यांनी यापुर्वी पाठपुरावा केला आहे. गावात पडक्या घरात त्यांचे वास्तव्य असल्याचे जीवन जगने धोकादायक झाले आहे. यामुळे समाज बांधवात असंतोष आहे.
रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते मिळाले नाही. घरकुलांचे बांधकाम अडले आहे. शासन स्तरावर तात्काळ अनुदान दिले पाहिजे.
-किशोर रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता बिनाखी.