वरठी : भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या दोन कर्मचाऱ्यांना मानाच्या जीएम अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. सुरक्षा व तांत्रिक विभाग कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. नागपूर विभागातून ११ रेल्वे कमर्चाऱ्यांची निवड झाली असून, त्यात दोन कर्मचारी भंडारा रोड रेल्वे स्थानकात कार्यरत आहेत. रेल्वे सुरक्षा हवालदार भूपेश देशमुख व तांत्रिक विभागाचे सचिन सुरेश गाढवे यांचा समावेश आहे.
रेल्वेच्या स्थापनानिमित्त दरवर्षी रेल्वेकडून कार्यरत कर्मचाऱ्यांना जीएम अवॉर्ड ने सन्मानित करण्यात येते. रेल्वेच्या विविध विभागांत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर पुरस्कार देण्यात येते. प्रमाणपत्र, पदक, रोख बक्षीस व रेल्वेच्या वार्षिक अहवालात फोटोसह माहिती प्रकाशित केल्या जाते. २०१९-२० या वार्षिक कारकिर्दीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या भंडारा रोड रेल्वे स्थानकाच्या दोन कर्मचाऱ्यांना ६५ जीएम अवॉर्ड वितरण कार्यक्रमात रेल्वेचे महाव्यवस्थापक गौतम बॅनर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात हवालदार भूपेश देशमुख यांनी रेल्वे स्थानक येथे विविध कामांत उत्कृष्ट काम केले. रेल्वे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशाची सुरक्षा व घरून न सांगता पळून जाणाऱ्यांना कुटुंबाच्या स्वाधीन करणे, कार्यालयीन कामात चोख दस्तावेज ठेवणे, यासह रेल्वे स्थानक परिसरात गुन्हेगार व अवैद्य कामाला आळा घालणे अशी विविध कामे चोख बजावली. तांत्रिक विभागात कार्यरत सचिन गाढवे यांनी रेल्वे संबंधित तांत्रिक कामात अद्वितीय कामगिरी बजावली. मानाच्या जीएम अवॉर्डने सन्मानित केल्याबद्दल भंडारा रोड स्थानकांच्या वतीने सचिन गाढवे व भूपेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अनिल पाटील, स्टेशन मास्टर मेघराय मुरमु, परमानंद वर्मा, उपनिरीक्षक दीपक कुमार, ओमप्रकाश शेंडे, प्रधान आरक्षक पी. के. दुबे, कृष्ण सावरकर, जयंतीलाल उपस्थित होते.