हॉलमार्किंग प्रणाली गत १६ वर्षांपासून व्यवस्थित सुरू आहे. व्यावसायिक आणि ग्राहकांनी तिचा स्वीकार केला आहे. परंतु कोणताही विचारविमर्श न करता नवीन एचयुआयडी प्रणाली लागू करण्याचा घाट शासनाने घातला आहे. यामुळे लहान आणि मध्यम सुवर्ण व्यावसायिक अडचणीत येणार आहेत. त्यातून व्यवसाय ठप्प होण्याची भीती आहे.
भंडारा येथील सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष तुषार काळबांडे म्हणाले, एचयुआयडी प्रणाली सरकार इतक्या लवकर का करत आहे, हे कळायला मार्ग नाही. हॉलमार्किंग आता अनिवार्य करण्यात आले आहे. पारंपरिक सुवर्ण व्यवसायात दोन ते पाच लाखाचा वार्षिक व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांपासून हजार कोटींचा व्यवसाय करणाऱ्यांपर्यंतचा समावेश आहे. ६० ते ७० टक्के व्यापारी हॉलमार्किंगशी परिचित नाहीत. त्यात अचानक एचयुआयडी लागू केले गेले आहेत. सरकारने याआधी हॉलमार्किंगची पूर्णपणे सवय लावावी आणि त्यानंतरच एचयुआयडीचा विचार करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे.
ही प्रणाली लागू केल्यानंतर अनेक मध्यम व लहान सुवर्ण व्यावसायिक स्वत:ला त्याच्याशी जुळवून घेण्यास असमर्थ ठरतील. या व्यवसायातून मोठ्या संख्येने व्यक्ती बेरोजगार होतील. सरकारने या भूमिकेचा विचार करावा, यासाठी सराफा व्यावसायिकांनी सोमवारी बंद पाळून आपला विरोध दर्शविला आहे.
बॉक्स
भंडारा शहरातील सराफा दुकाने कडकडीत बंद
केंद्र सरकारच्यावतीने सोन्याच्या दागिन्यांसाठी एचयुआयडी प्रणाली लागू केली. या प्रणालीला विरोध करण्यासाठी भंडारा सराफा असोसिएशनच्यावतीने कडकडीत बंद पाळला. एचयुआयडीची प्रक्रिया एवढी लांब आहे की, एका दागिन्यासाठी व्यापाऱ्याला हॉलमार्किंग सेंटरवर एचयुआयडी करण्यासाठी १५ ते १८ दिवस लागतात. हेच काम पूर्वी तीन तासात होत होते. ही किचकट प्रक्रिया थांबविण्यासाठी व्यापाऱ्यांनी बंद पाळला.