लाखो कलाकार, नृत्य शिक्षकांवर उपासमारीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:34 AM2021-04-13T04:34:07+5:302021-04-13T04:34:07+5:30
नृत्य वर्ग करमणुकीसाठी अनेकांना लाभदायक ठरला आहे. यातूनच अनेकांनी रोजगार शोधला; पण स्वत:च्या अंगभूत कलेच्या बळावर ज्यांनी रोजगार मिळवला, ...
नृत्य वर्ग करमणुकीसाठी अनेकांना लाभदायक ठरला आहे. यातूनच अनेकांनी रोजगार शोधला; पण स्वत:च्या अंगभूत कलेच्या बळावर ज्यांनी रोजगार मिळवला, त्यांच्यावर कोरोनामुळे उपासमारीची पाळी ओढवली आहे. त्या सर्व कलाकारांना ही बंदी कर्दनकाळ ठरली आहे. कोरोना संकट मोठे असले तरी पोटाची भूक शमविणेही तेवढेच आवश्यक आहे. कोरोनाने रोजगार हिरावला आहे. अनेक नृत्य शिक्षकांची अवस्था आज फारच दयनीय झालेली आहे. हाताला काम नसल्याने दिवस कसा, कुटुंब चालवायचे कसे असा प्रश्न पडत आहे. नृत्य शिक्षक बनविण्यासाठी अहोरात्र कष्ट, नृत्याचे शिक्षण, रात्रंदिवस नृत्याचा सराव करावा लागतो, यामुळे त्या शिक्षकांनी इतर व्यवसायांचा कधी विचारच केला नाही. मात्र, आता उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नसल्याने शिक्षकांची अवस्था वाईट झाली आहे.
बॉक्स
अन्यथा लोककला नामशेष होईल...
कोरोनामुळे सर्वच प्रकारचे नृत्य शिकविणारे शिक्षक उपासमारीचा सामना करीत आहेत. समजा आज नृत्य शिक्षकांना, कलाकारांना सरकारने वाचविले नाही, तर उद्या लोककला आपल्या राज्यातून नामशेष होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मानवी आयुष्यात मनोरंजनही आवश्यक आहे. यासाठी सरकारने सहानुभूतीपूर्वक कलाकारांसह नृत्य शिक्षकांचा विचार करून नृत्य शिक्षकांना वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका नृत्य परिषद सचिव व संस्थापक श्री साई संकल्प नृत्य कला बहुउद्देशीय संस्था भंडारा, रोशन शेंद्रे यांनी यांनी व्यक्त केली आहे.