साकोली : वीरू, जय, डेंडू, राष्ट्रपती या वाघांच्या अधिवासाने प्रसिद्धीस आलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अधिवासासाठी आदर्श ठिकाण आहे. घनदाट जंगल आणि मानवी हस्तक्षेेप नसलेला हा प्रदेश असल्याने येथे वाघांचा मुक्तसंचार असतो. नवेगाव-नागझिरा अभयारण्य म्हणजे वाघभूमी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेवर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. देशातील ४६ वा आणि राज्यातील पाचवा व्याघ्र प्रकल्प आहे. १२ डिसेंबर २०१३ रोजी या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. जैवविविधतेत अव्वल दर्जा असलेला हा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. नागझिरा, नवीन नागझिरा, कोका, नवेगाव आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचा या व्याघ्र प्रकल्पांतर्गत समावेश आहे.
वाघाशिवाय जंगल संतुलित राहू शकत नाही आणि जंगलाशिवाय मानवी जीवन धोक्यात येऊ शकते. ही बाब लक्षात आल्यावर वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला. भंडारा जिल्ह्यात सद्य:स्थितीत आठ वाघ असल्याची माहिती आहे. अनेकदा या वाघांचे दर्शनही होते. वीरू, जय, राष्ट्रपती, डेंडू या वाघांनी या अभयारण्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले. वाघांची संख्या विदर्भात वाढत असताना या अभयारण्यातही आता वाघांचा मुक्तसंचार दिसून येत आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विपुल वनसंपदा असून, घनदाट जंगलात बिबट्या, रानकुत्री, अस्वल, सांबर, चितळ, नीलघोडा, गव्हा यासह मोर, रानकोंबडी, मत्स्य गरुड असे विविध प्रजातीचे प्राणी आहेत. यासोबतच सरपटणारे जीव आणि कीटक आहेत. निसर्गप्रेमींसाठी नवेगाव-नागझिरा प्रकल्प पर्वणी असते. मात्र, गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे पर्यटन ठप्प झाले होते. याचा परिणाम लगतच्या गावांवरही झाल्याचे दिसून येते. उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोरोना काळात जंगलाकडे कुणीही फिरकले नाही. मात्र, वन्यजीव विभागाने या जंगलाची देखभाल योग्य प्रकारे राखली. साकोली तालुक्यातील पिटेझरी गेट पर्यटकांना नेहमी खुणावत असते. पर्यटकांची येथे नेहमीच वर्दळ असते.
जय-वीरू वाघांची प्रसिद्ध जोडी
नवेगाव-नागझिरा आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी या अभयारण्यात मुक्तसंचार असलेल्या जय आणि वीरू या देखण्या व रुबाबदार वाघांनी या दोन्ही अभयारण्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. या वाघांचे दर्शन घेण्यासाठी मुंबईपासून पर्यटक येत होते. मात्र, जय अचानक बेपत्ता झाला. पाठोपाठ वीरूही दिसेनासा झाला आणि पर्यटक निराश झाले.
व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या बऱ्यापैकी आहे. वनक्षेत्रात वाढ झाली आहे. गस्तही वाढली आहे. ट्रॅप कॅमेऱ्यांची सोय आहे. अधिकाऱ्यांची करडी नजर असते. पाण्याची मुबलकता आणि पाणवठ्यांची योग्य देखभाल यामुळे नवेगाव-नागझिरा अभयारण्यात जैवविविधता पाहावयास मिळते. आता वाघाच्या अधिवासासाठी विशेष प्रयत्न करून त्यांच्या संवर्धनात येणाऱ्या समस्येवर उपाय करणे गरजेचे आहे.
-विनोद भोवते,
अरण्ययात्रा पुस्तकाचे लेखक