२७ लो १५ के
भंडारा : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात सेवारत अंशकालीन महिला परिचरांनी आंदोलनाद्वारे केलेल्या १० मागण्या प्रशासनाने त्वरित पूर्ण कराव्यात, मागण्या पूर्ण न झाल्यास परिचरांच्या मागण्यांसाठी अखेर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांनी दिला आहे. त्यांनी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर सोमवार, २६ जुलैपासून सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनात उपस्थित जिल्ह्यातील महिला परिचरांना मार्गदर्शन केले.
महिला परिचरांनी पुकारलेल्या या बेमुदत आंदोलनाचे नेतृत्व आदर्श युवा मंचचे अध्यक्ष, संस्थापक पवन मस्के, जनसेवक भंडारा यांनी केले असून, या आंदोलनाला आदर्श युवा मंचच्या वतीने संपूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे.
मस्के म्हणाले की, महिला परिचरांना पल्स पोलिओ, आयपीपीआय, डीईसी कार्यक्रम, कुष्ठरोग अशा विविध कार्यक्रमांत प्रशासनाद्वारे सहभागी करण्यात येते, मात्र त्याचा मोबदला दिला जात नाही. हा महिला परिचरांवर अन्याय असून कोरोना महामारीच्या काळातसुद्धा या महिला परिचरांना गणवेष व ओळखपत्र दिले जात नाही. याहून अधिक शोकांतिका कुठली आहे. महिला परिचरांवरील हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. महिला परिचरांना किमान वेतन देण्यात यावे, महिला परिचरांना नियमित सेवेत कायम करावे, परिचरांना गणवेष व ओळखपत्र देण्यात यावे, कोविड भत्ता देण्यात यावा, परिचरांना व्यतिरिक्त मोबदला देण्यात यावा, पेंशन योजना लागू करावी, दरवर्षी गणवेष व भाऊबिज देण्यात यावे, मासिक मानधन दर महिन्याला ५ तारखेच्या आत देण्यात यावे, चादरी, बेडशिट, पडदे धुलाई भत्ता देण्यात यावा व कार्यक्षेत्रात फिरण्यासाठी प्रवास भत्ता देण्यात यावा आदी या आंदोलनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या प्रशासनाने त्वरित पूर्ण कराव्यात. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपला पाठिंबा या आंदोलनाला शेवटपर्यंत राहील. गरज पडल्यास महिला परिचरांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी आंदोलनात उपस्थित आंदोलनकर्त्यांसमोर दिला.
जिल्हा परिषद महिला परिचर महासंघ जिल्हा शाखा भंडाराच्या वतीने जि.प. कार्यालयासमोर पुकारलेल्या बेमुदत आंदोलनात आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांच्या पुढाकारात सविता हटवार - सरचिटणीस, माधुरी चोले - उपाध्यक्ष, वीणा टीचकुले - कोषाध्यक्ष, चंदा नदानवार - जिल्हा अध्यक्ष, स्नेहलता सुनील रामटेके, प्रेमलता गोकुलदास मेश्राम, कविता ईश्वर उईके, मीना नत्थु डोमळे, अंजू धनंजय रामटेके, अंजू दिलीप वैद्य, संगीता नगरकर, धमावती नंदेश्वर, सिंधू खोटेले, चित्रा तिरपुडे, निरूता कोचे, दुर्गा गजबे, हिरा भेंडारकर व जिल्ह्यातील इतर महिला परिचर तसेच आदर्श युवा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.