चुल्हाड ( सिहोरा) : तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात रेतीचा अवैध उपसा सुरू झाला आहे. पांजरा घाटावरून महसूल, पोलीस आणि खनिकर्म विभागाच्या संयुक्त कारवाईने २१ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर मेळा लागल्याचे अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून राजरोसपणे रेती चोरी सुरू असताना प्रशासनाने लक्ष केंद्रित केले नव्हते, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बावणथडी नदी पात्रालगत असणाऱ्या सोंड्या, वारपिंडकेपार, महालगाव घाटावरून रेतीचा राजरोसपणे ट्रॅक्टरच्या माध्यमातून उपसा सुरू आहे. दिवस-रात्र बेधडकपणे रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. बावणथडी नदीच्या पात्रातून रेतीचा उपसा करण्यात येत असताना, एकाही ट्रॅक्टरचालक व मालकाचेविरोधात कधी कारवाई झाली नाही. या परिसरात कोणतेही घाट लिलावात काढण्यात आले नाही. असे असताना अनेक कामे सुरू आहेत. सिहोरा परिसरातील ट्रॅक्टरधारकांना वैनगंगा नदी पात्रातून रेतीचा उपसा करताना अडचणी आहेत. परंतु याच नदीवरील पांजरा रेती घाट तुमसर शहरातील ट्रॅक्टरमालकांना पर्वणीच ठरत आहेत. या शहरातील ट्रॅक्टरमालक पांजरा घाटावरून रेतीचा अवैध उपसा करीत आहेत. या आठवड्यात खनिककर्म विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त करवाईने १३ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते. ट्रॅक्टर जप्तीवरून हशा पिकला होता. जप्त करताना ट्रॅक्टर पळून गेल्यानंतर रंगरूपपासून शोध मोहीम राबविण्यात आली असता, फक्त ६ ट्रॅक्टर गवसले आहेत. गुरुवारी पहाटे तहसीलदारांनी पांजरा घाटावर धाड घातली असता, ८ ट्रॅक्टर नदी पात्रातून ताब्यात घेतले आहेत. २१ ट्रॅक्टर यंत्रणेने ताब्यात घेतल्यानंतर रेती माफिया तरीही बिनधास्त असल्याचे चित्र दिसत आहेत. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचालक मालकाच्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले नाही. दरम्यान, एकाच जप्तीच्या ट्रॅक्टरविरोधात दोनदा दंडात्मक कारवाई करता येत नसल्याने प्रशासन चक्रावले आहे. न्यायालयीन कारवाईत दंडाची रक्कम अल्प राहत असल्याने रेतीमाफिया गुन्हे दाखल करण्यासाठी लगबग करीत आहेत. महसूल विभागाच्या कारवाईत १ लाख १० हजारांचा दंड भरावा लागत आहे.
फरार झालेल्या ट्रॅक्टरचा शोध घेण्यात येत आहे. १३ ट्रॅक्टरचालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुरुवारी पुन्हा ८ ट्रॅक्टर नदी पात्रातून ताब्यात घेण्यात आले आहेत. निश्चितच कारवाई केली जाईल.
नारायण तुरकुंडे, पोलीस निरीक्षक, सिहोरा