सुकडी-डाकराम : तिरोडा तालुक्यात अवैध रेतीची चोरटी वाहतूक जोरात सुरू आहे. रेतीमाफियांच्या या दबंगगिरीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे मनसुबे वाढले असून, ते कुणालाही जुमानत नसल्याचे दिसत आहे. मात्र, रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या या वाहनांमुळे अपघातांची शक्यता बळावली आहे.
तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा, घाटकुरोडा, पिपरिया, चांदोरी, अर्जुनी व सावरा या रेतीघाटांवरून अनेक दिवसांपासून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. रेतीमाफियांच्या या प्रकाराकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे रेतीची खुले आम वाहतूक केली जात आहे. यामुळे यात काहीतरी मिलीभगत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. रेतीची ही अवैध वाहतूक येथून होत असून, रेती वाहतूक करणारे ट्रकचालक कुणाची पर्वा न करता भरधाव वेगात गावातून ट्रक नेतात. त्यामुळे अपघातांचीही शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर बोदलकसा तलावात पाणी जाण्यासाठी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ चे काम जोरात सुरू आहे. त्यातच अवैध रेती वाहतुकीचे ट्रक अत्यंत वेगाने धावत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्यक्तींचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकाराकडे लक्ष देऊन प्रशासनाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक व मालकांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शासनाचा महसूल पाण्यात
तिरोडा तालुक्यातील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक सुरू असून, याकडे महसूल यंत्रणेचे पूर्णपणे दुुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रेतीच्या अवैध वाहतुकीची माहिती संबंधित विभागाला देऊनसुध्दा याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.