रोवणीसाठी मध्यप्रदेशातील महिला मजुरांची आयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 05:00 AM2022-07-11T05:00:00+5:302022-07-11T05:00:11+5:30
सिहोरा परिसरात यांत्रिक पद्धतीने धान पिकांची रोवणी करण्यात येत नाही. महिलांच्या माध्यमातून रोवणीची कामे केली जात आहेत. पावसाने हजेरी लावताच धान पिकांच्या रोवणीला परिसरात वेग आलेला आहे. यामुळे गावांत शेतकऱ्यांना महिला मजुरांचा तुटवडा असल्याचे जाणवत आहे. नजीकच्या मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावात महिला मजुरांचा शोध घेतला जात आहे. मध्यप्रदेशातील गावातही धान पिकांच्या रोवणीला सुरुवात झाली आहे; परंतु धानाचे नर्सरी उशिरा घातल्याने रोवणीच्या कार्यास गती आली नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धान पिकांच्या रोवणीला वेग आलेला आहे. सिहोरा परिसरात महिला मजुरांचा तुटवडा असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आलेला आहे. यातच मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावातून महिला मजुरांची आयात करण्यात येत आहे. मजुरीचे दर वाढले असून वाहनांचा खर्चही महागला आहे. मजुरांचे आयात करण्यात स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सिहोरा परिसरात यांत्रिक पद्धतीने धान पिकांची रोवणी करण्यात येत नाही. महिलांच्या माध्यमातून रोवणीची कामे केली जात आहेत. पावसाने हजेरी लावताच धान पिकांच्या रोवणीला परिसरात वेग आलेला आहे. यामुळे गावांत शेतकऱ्यांना महिला मजुरांचा तुटवडा असल्याचे जाणवत आहे. नजीकच्या मध्यप्रदेशातील सीमावर्ती गावात महिला मजुरांचा शोध घेतला जात आहे. मध्यप्रदेशातील गावातही धान पिकांच्या रोवणीला सुरुवात झाली आहे; परंतु धानाचे नर्सरी उशिरा घातल्याने रोवणीच्या कार्यास गती आली नाही.
या गावात असणाऱ्या महिला मजुरांची आयात करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या मजुरांना ने-आण करण्यासाठी वाहन उपलब्ध करण्यात येत आहे. डिझेल महागल्याने चारचाकी वाहनांचा खर्चही महागला आहे. शेतकऱ्यांनी धान पिकांची रोवणी लवकर आटोपण्यासाठी महिला मजुरांकरिता घरपोच सेवा सुरू केली आहे. दरवर्षी येणाऱ्या महिला मजुरांना शेतकऱ्यांनी अतिरिक्त मजुरी वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.
पुरुष मजुरांच्या मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. याशिवाय खरीप हंगामातील रोवणीच्या कामात उपयोगात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या प्रतितासात ३०० रुपयांनी वाढ ओलांडली आहे. प्रति तास एक हजार रुपयाने दर गाठले आहेत. परिणामी शेतकऱ्यांवरील संकट संपत नसल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहे.
धानाचे दर पडले, खत महागले
- खुल्या बाजारात धानाचे दर पडले आहेत. १३५० रुपये प्रतिक्विंटल धानाची विक्री शेतकऱ्यांनी सुरू केली आहे; परंतु खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. खतांची ५० किलोची बॅग १५०० रुपयाने महागली आहे. सरासरी प्रतिएकर २० हजार रुपये येत असताना महागाईने ३० हजार रुपयांचा खर्च ओलांडणार आहे. यात खत, बी बियाणे, औषध फवारणी, मजूर, व अतिरिक्त खर्च असले तरी शेती परवडणारी नाही. अशी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहेत.
भावांनो ! जरा सांभाळून
- खरीप हंगामातील शेतीचे कामे जोरात सुरू आहेत. ट्रॅक्टरने शेतीचे कामे केली जात आहेत. ट्रॅक्टरच्या चाकांना मातीचे पेंडके राहत आहेत. मार्गावर थेट ट्रॅक्टर धावत असल्याने मातीचे पेंडके पडल्याचे दिसून येत आहेत. हे मातीचे पेंडके मोटरसायकलच्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. रात्री मोटारसायकलने प्रवास करताना पेंडक्यामुळे धोकादायक ठरत आहेत. पाऊस येताच ह्या मातीच्या पेंडक्यावरून वाहनांचे अपघात होत आहे. शेतातून बाहेर पडताच चाकांना मातीचे पेंडके स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.