देवानंद नंदेश्वर
भंडारा : कृषी विभागाने नगदी पिकाबाबत प्रोत्साहन दिले. मात्र गत काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा उपद्रव आणि चुकाऱ्यांना होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी उसाऐवजी पुन्हा धान लागवडीकडे वळले आहेत. जिल्ह्यात साखर कारखान्याअभावी उसाचे क्षेत्र कमी झाले आहे.
भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पूर्वापार धानाची लागवड करीत आहेत. परंतु, त्यातही तेल व डाळवर्गीय पिकांसोबत कडधान्य, भाजीपाला, ऊस आदी पिके घेतली जात असल्याचा उल्लेख इंग्रज शासन काळातील गॅझेटियरमध्ये आहे. साकोली, तुमसर तालुक्यातील गुळाचा मध्यप्रदेश व विदर्भातील जिल्ह्यात व्यापार केला जात होता. आधुनिक काळात कृषी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला. सिंचनाच्या सोयीनुसार शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेत आहेत. १९८० च्या दशकात जिल्ह्यातील नेत्यांनी शेतकऱ्यांना नगदी पीक घेता यावे, यादृष्टीने प्रयत्न करून सहकारी तत्त्वावर साखर कारखाना सुरू केला. त्यानंतर पवनी तालुक्यात आणखी एका कारखान्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आपसातील ओढाताणीमुळे तो कारखाना पूर्ण झालाच नाही.
दरम्यान, नगदी पीक घेण्याबाबत शासन व कृषी विभागाने प्रोत्साहन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड करण्यावर भर दिला. या पिकाला सिंचनाची अधिक गरज असते. त्याबाबत भंडारा जिल्ह्यात तलाव, बोड्या विपुल प्रमाणात असल्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. त्यामुळे शेकडो टन उसाचा साखर कारखान्यांना पुरवठा होत होता. जिल्ह्यात उसाचे उत्पादन अधिक होत असल्याने मौदा व उमरेड तालुक्यातील कारखान्यांनासुद्धा जिल्ह्यातून ऊस पुरवठा केला जात होता. दरम्यान, सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात आल्याने त्याची विक्री करण्यात आली.
लाखांदूर येथे एक लघु साखर कारखाना स्थापन करण्यात आला. त्याचा फायदा लाखांदूर व चौरास भागातील शेतकऱ्यांना होत होता. त्यावेळी जिल्ह्यातील उसाच्या पिकाखालील क्षेत्र १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक होते. मात्र, कारखान्यांकडून चुकाऱ्यांना होणारा विलंब, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढत गेल्याने शेतकऱ्यांना उसाचे पीक परवडेनासे झाले. शेवटी लाखांदूर येथील साखर कारखानाही बंद पडला. त्यामुळे शेतकरी पुन्हा आपल्या पारंपरिक पिकाकडे वळले आहेत. यावर्षी जिल्ह्यातील उसाचे एकूण क्षेत्र १८१५ हेक्टर आहे.
वन्यप्राण्यांची वाढती संख्या
जिल्ह्यात कोका, न्यू नागझिरा आणि कऱ्हांडला- पवनी- उमरेड हे नवीन अभयारण्य झाले आहेत. जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यांतील अनेक गावे अभयारण्याच्या बफर झोनमध्ये येतात. गावाजवळील जंगलातून रानडुकरे व अन्य प्राणी उसाच्या वाडीत आश्रय घेतात. त्यांच्या शिकारीसाठी बिबटे व हिंस्र प्राणीही शेतात आल्याने शेतकऱ्यांसोबत वन्यप्राण्यांचा संघर्ष वाढला आहे. पवनी तालुक्यात व कोका या गावाजवळ उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले आढळून आली होती. वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड करणे बंद केले आहे.