संतोष जाधवर लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी भंडारा शहरातही सिग्नल व्यवस्था उभारली आहे. मात्र, हे सिग्नल केवळ नावालाच दिसून येत आहेत. भंडारा शहरातील नागपूर नाका, जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, गांधी चौकात सिग्नल यंत्रणा उभारली आहे. मात्र, हे सिग्नल अजूनही सुरू झालेले नाहीत. शहरातील सिग्नल सुरू नसले, तरी वाहतूक पोलीस मात्र शहरातील सर्व चौकांमध्ये कर्तव्यावर दिसून येतात. वाहतुकीचा ताण वाहतूक पोलिसांवर वाढत असून सिग्नल व्यवस्था सुरू झाल्यास पोलिसांवरील हा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून, उभी केलेली ही सिग्नल व्यवस्था पुन्हा कधी सुरू होणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरितच आहे. वाहतूक पोलीस आपली महत्त्वाची भूमिका बजावितात. पण, सिग्नल व्यवस्था केवळ शोभेपुरतीच उरली असून, अजूनतरी धूळखात पडली आहे.
जिल्हा परिषद चौक
शहराचा वाढता विस्तार पाहता भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे येथे कार्यरत वाहतूक पोलिसांनाही अनेकदा चांगलीच कसरत करावी लागते. शिवाय, एखाद्या वाहनधारकावर कारवाई करत असताना दुसरे वाहनधारक अतिवेगाने धूम ठोकतात. यामुळे वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी नागपूर नाका, जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक येथील सिग्नल यंत्रणा लवकर सुरू करण्याची गरज आहे.
त्रिमूर्ती चौक
संपूर्ण जिल्ह्याचे महत्त्वाचे केंद्रबिंदू असलेला त्रिमूर्ती चौक भंडारा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातच भंडारा पंचायत समितीसमोरील अस्ताव्यस्त वाहनांचे पार्किंग व त्रिमूर्ती चौकातील रस्त्यालगत फळविक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण पाहता येथे भंडारा नगर परिषदेने कारवाई करण्याची गरज आहे. शिवाय, या महत्त्वाच्या चौकातील सिग्नल बंद दिसत आहे.
ना सिग्नल, ना वाहतूक पोलीस भंडारा शहरातील आरटीओ कार्यालयासमोरच वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. मात्र, याठिकाणी ना सिग्नल दिसतात, ना वाहतूक पोलीस. येथे अनेकदा बीटीबीकडे जाणारी-येणारी वाहने व महामार्गावरील अतिवेगाने येणारी वाहने यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. हीच अवस्था भंडारा तहसील पंचायत समिती कार्यालयासमोर दिसून येत आहे. थेट रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जातात.
नियम तोडू नका, वाहतूक पाेलीस पाहताेय
१ भंडारा शहरातील सिग्नल सुरु नसले तरी शहरातील विविध चौकात वाहतूक पोलीस कार्यरत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर थेट कारवाई केली जाते. अतीवेगाने पाेलिसांची नजर चुकवून गेले तरी पाेलीस गाडीचा फाेटाे काढून कारवाई करतात.२ शहरातील सिग्नल सुरू झाले पाहिजे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे जिल्हा परिषद चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, नागपूर नाका, राजीव गांधी, खाम तलाव चौकातील वाहतुकीची समस्या सुटू शकेल. यामुळे वाहतूक पाेलिसांनाही दिलासा मिळेल.