लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप व रबी हंगामात खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रतिक्विंटल दहा रूपये भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून ३० रूपये वाढीव भरडाई दर देण्यात येणार आहे. त्यामुळे आता धान भरडाईसाठी मिलर्सना प्रतिक्विंटल ४० रूपये मिळणार आहे.आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन विविध पिकांच्या किमान आधारभूत किमती जाहीर करते. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासन धान्याची आधारभूत किमतीने खरेदी करते. या योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धानाची भरडाई मिलर्सकडून करून घेऊन मिळणारा तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडे जमा करण्यात येत होता. चालू हंगामापासून हा सीएमआर गिरणी मालकांमार्फत शासकीय गोदामात जमा करण्यात येत आहे.किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी येणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती केंद्र शासनातर्फे भारतीय अन्न महामंडळाच्या मार्फत करण्यात येते. धान भरडाईकरिता कच्च्या तांदळासाठी रूपये व उष्मा तांदळासाठी २० रूपये प्रतिक्विंटल असा दर देण्यात येत आहे. केंद्र शासनाने या दरात २००५-०६ पासून सुधारणा केलेली नाही. यामुळे मागील वर्षाच्या खरीप पणन हंगामाकरिता केंद्र शासनाकडून निश्चित केलेल्या दहा रूपये प्रति क्विंटल दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून भरडाई दरात प्रति क्विंटल ३० रूपये वाढ करण्यात आली होती. भरडाई दर वाढविल्याने त्यावर्षी धान खरेदीच्या ९६.६७ टक्के धानाची भरडाई झाली आहे.भरडाईविना शिल्लक असलेल्या धानाची भरडाई होणे गरजेचे असल्यामुळे भरडाईचे वाढीव दर निश्चित करणे गरजेचे होते. भरडाईअभावी धानाची नासाडी टाळणे, दीर्घकाळ साठवणुकीच्या खर्चाचा भार टाळण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीच्या हंगामासाठीही केंद्र शासनाच्या मंजूर दराव्यतिरिक्त ३० रूपये प्रतिक्विंटल असा वाढीव दर जाहीर केला आहे. सन २०१६-१७ मधील संभाव्य खरेदी ७० लाख क्विंटल गृहित धरण्यात आली असून त्यासाठी येणाऱ्या २१ कोटी रूपये खर्चाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे.
धान भरडाईसाठी प्रतिक्विंटल ३० रूपयांचा वाढीव दर
By admin | Published: June 09, 2017 12:43 AM