ज्ञानेश्वर मुंदे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांड प्रकरणाच्या चौकशी समितीचा अहवाल येण्यास आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्र्यांनी तीन दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी समितीच्या अध्यक्षांची उचलबांगडी केली. नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली. मंगळवारी हा अहवाल अपेक्षित होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी समितीच्या अध्यक्षांची उचलबांगडी करून, त्या ठिकाणी नागपूरचे विभागीय आयुक्त डाॅ.संजयकुमार यांची नियुक्ती केली. तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. चौकशी समितीने काम सुरू केले असून, रुग्णालयाच्या पाहणीसोबत जबाब नोंदविणे सुरू असल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, चौकशी समितीच्या अहवालानंतर, जी तक्रार प्राप्त होईल, त्यानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले. एकंदर या प्रकरणी टाळाटाळ केली जात आहे.