जिल्ह्यातील 25 आधारभूत धान खरेदी केंद्रांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 05:00 AM2022-07-13T05:00:00+5:302022-07-13T05:00:06+5:30
शासनाने वाढवून दिलेल्या धान खरेदीची मर्यादेचा फायदा घेत व्यापाऱ्यांचाच धान खरेदी करण्याचा प्रकार उघकीस आला. त्यावर खासदार सुनील मेंढे यांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी रब्बी हंगामातील धान खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ८ जुलै रोजी दिले. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश निर्गमित करून धान खरेदी केंद्रांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अवघ्या सहा तासांत ६ लाख ४१ हजार क्विंटल धान खरेदीचा ‘विक्रम’ करणाऱ्या जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी केंद्राची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील २५ केंद्रांची चौकशी करण्यासाठी पथक गठित करण्यात आले असून यात नागपूर आणि वर्धा येथील महसूल अधिकारी आहेत. या चौकशीने धान खरेदी घोटाळ्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
शासनाने वाढवून दिलेल्या धान खरेदीची मर्यादेचा फायदा घेत व्यापाऱ्यांचाच धान खरेदी करण्याचा प्रकार उघकीस आला. त्यावर खासदार सुनील मेंढे यांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार यांनी रब्बी हंगामातील धान खरेदी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ८ जुलै रोजी दिले. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश निर्गमित करून धान खरेदी केंद्रांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. त्यात वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत स्थानिक २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली. आता या धान खरेदीतील घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. आता चौकशी अहवाल कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या केंद्रांची होणार तपासणी
- भंडारा तालुक्यातील पहेला, बेलगाव, खुटसावरी, तुमसर तालुक्यातील रूपेरा, लाखांदूर तालुक्यातील कऱ्हांडला, विरली बुज., सोनी, पिंपळगाव (को), लाखांदूर, डोकेसरांडी, लाखनी तालुक्यातील लाखनी, राजेगाव, पिंपळगाव, पवनी तालुक्यातील ब्रम्ही, कातुर्ली, धामणी, सावरला, साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा, वलमाझरी, साकोली, जांभळी (स), एकोडी, रेंगेपार, बांपेवाडा आणि घानोड या केंद्राचा समावेश आहे. अधिकारी या केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन तपासणी करून अहवाल प्रशासनाला सादर करणार आहेत.
हे अधिकारी करणार तपासणी
- वर्धा येथील उपजिल्हाधिकारी खैरनार, उमरेडचे उपविभागीय अधिकारी खंडाईत, रामटेकचे तहसीलदार म्हस्के, भिवापूरचे तहसीलदार कांबळे, वर्धाचे तहसीलदार लोखंडे, कावळे, कुहीचे नायब तहसीलदार पागोटे, पारशिवणीचे नायब तहसीलदार दुसावार, वर्धाचे नायब तहसीलदार दिगलवार, वर्धाच्या नायब तहसीलदार जाधवर, गुजर तपासणी करणार आहेत. त्यांच्यासोबत भंडारा जिल्ह्यातील २२ अधिकारी राहणार आहेत.