जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत कार्यरत असलेल्या लिपिक संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व समस्यांच्या निराकरणासाठी ६ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जिल्हा परिषद समन्वय कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत सुरू असलेल्या बैठकी दरम्यान संबंधित अधिकारी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना असभ्य व अपमानजनक वागणूक दिली. त्यामुळे संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त करून १९ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून विदर्भ माध्यमिक व खासगी प्राथमिक शिक्षक संघाने जाहीर पाठिंबा दिल्याचे अधिकृत पत्र विभागीय अध्यक्ष यांना दिले आहे.
राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासन यांच्या स्तरावर कार्यरत कर्मचारी यांच्या अनेक समस्या प्रलंबित असतात. याकडे शासन तसेच प्रशासकीय अधिकारी हे आपले अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे स्वतःच्या मागण्यांकडे सरकारचे तसेच प्रशासकीय अधिकारी यांचे लक्ष वेधण्याकरिता संघटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी धडपड करत असतात. मात्र, वरिष्ठ वर्गातील काही प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या धुडकावून लावण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा अपमान करून लोकशाही मार्गाने आवाज उठविणाऱ्या संघटनेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करतात.
अशा अधिकाऱ्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. त्यामुळे लिपिक वर्ग संघटनेने पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा असल्याचे विमाशिचे राजेश धुर्वे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर रहांगडाले, विलास खोब्रागडे, अरुण मोखारे, दारासिंग चव्हाण, जयंत पंचबुधे, अशद शेख, पुरुषोत्तम लांजेवार, धनवीर कानेकर, जागेश्वर मेश्राम, शालिकराम खोब्रागडे, प्रेमलाल मलेवार, भाऊराव वंजारी, सुधाकर धाडसे, मनोहर मेश्राम, पंजाब राठोड, अनंत जायभाये आदींनी कळविले आहे.
कोट बॉक्स
राज्य तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रशासकीय अधिकारी यांचे कर्मचाऱ्यांच्या समस्यांशी काही देणे -घेणे नाही. त्यामुळे आपल्याच साहेबी तोऱ्यात कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यात मग्न असतात. याशिवाय यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे यांना वठणीवर आणण्यासाठी संघटन शक्ती महत्त्वाची आहे.
-राजेश धुर्वे,
जिल्हा कार्यवाह, विमाशि संघ, भंडारा.