भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्नितांडवाला आता १३ दिवस पूर्ण हाेत असून आतापर्यंत चिडीचूप असणारे या घटनेवर दबक्या आवाजात का हाेईना बाेलायला लागले. ९ जानेवारीच्या पहाटे केवळ आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात चाळीस मिनिटे गेली. आग लागल्यापासून दार उघडण्यापर्यंतचा चाळीस मिनिटांचा वेळच दहा निष्पाप जीवांचा बळी घेऊन गेला. या कक्षात डाॅक्टर आणि कर्मचारी उपस्थित असते तर ती निरागस चिमुकले आज आपल्या आईच्या कुशीत बागडत असती.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे भीषण अग्नितांडव झाले. दहा बालकांचा बळी गेला. सात बालकांना वाचविण्यात यश आले. नेमकी घटना कशी घडली यावर कुणी बाेलायलाच सुरुवातीला तयार नव्हते. आता १३ दिवसांनंतर रुग्णालयातील स्थिती सामान्य हाेत असून या विषयावर चकार शब्द न बाेलणारे आता दबक्या आवाजात बाेलू लागले आहेत. ही घटना घडली तेव्हा कक्षात कुणीही उपस्थित नव्हते. आग लागल्याचे कुणालातरी सर्वप्रथम माहीत झाले आणि त्यानंतर एकच गाेंधळ उडाला. हा गाेंधळ तब्बल चाळीस मिनिटे सुरू हाेता. कुणाला कळत नव्हते, दार ठाेठावणे आणि धावपळ एवढेच सुरू हाेते. घटनास्थळी हाहाकार उडाला हाेता. कर्तव्यावर असलेले कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असते तर कदाचित ही घटना टाळताही आली असती, असे आता बाेलले जात आहे. खुद्द जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही त्या रात्रीच्या घटनेची चर्चा सुरू आहे. नेमके काेण दाेषी यावरून चर्चा हाेत आहे. या ठिकाणी नियुक्त डाॅक्टर आण परिचारिका उपस्थित असत्या तर ही घटना टाळता आली असती, असे अनेकजण सांगत आहेत.
बाॅक्स
खाली-वर जाण्यात गेला वेळ
आंतरुग्ण इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर असलेल्या आयसीयू कक्षासमाेर एसएनसीयू कक्ष आहे. यामध्ये दाखल नवजात बालकांना दूध देण्याची वेळ ठरवून दिली असते. नेमके त्याचवेळी बाळाला दूध द्यावे लागते. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास माता आपल्या बालकांना स्तनपान करण्यासाठी गेल्या हाेत्या. हे त्यांचे शेवटचे स्तनपान ठरले. बाळांना दूध दिल्यानंतर सर्व माता प्रसूतीपश्चात वाॅर्डात झाेपी गेल्या हाेत्या. त्यानंतर आरडाओरडा आणि धूर पाहून या कक्षाकडे धाव धेतली. मातांसाेबत असलेले नातेवाईक तळमजल्यावरच हाेते. त्यांना वर येण्यास वेळ झाला. काहींनी त्यांना अडविल्याने बालकापर्यंत पाेहाेचता आले नाही. प्रचंड आरडाओरड हो असल्याने काय हाेत आहे हे कळायच्या आत या दहा बालकांनी जगाचा कायमचा निराेप घेतला.