जिल्हा पोलीस अधीक्षक, विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात नक्षलग्रस्त भागातील जनतेशी सुसंवादातून हितगुज करून त्यांच्या समस्या सोडविण्याच्या संकल्पनेतून ग्राम खडकी येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे औचित्य साधून येथील ९० आदिवासी कुटुंबीयांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, ठाणेदार संदीप इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक जोहेब शेख, पोलीस उपनिरीक्षक ठवकर, पोलीस उपनिरीक्षक टाफे, पोलीस उपनिरीक्षक मारग उपस्थित होते. प्रास्ताविकातून पोलीस उपनिरीक्षक ठवकर यांनी जनजागरण मेळाव्याची उद्दिष्टे सांगून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. अशोक बनकर यांनी नक्षलग्रस्त भागातील जास्तीत जास्त युवतींनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि पोलीस विभागासह इतर आवडीच्या क्षेत्रात नोकरीसाठी पुढे यावे, आदिवासी युवक- युवतींना शासकीय सेवेची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून पोलीस विभाग आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असून, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी वाचनालयाच्या माध्यमातून व्यवस्था करून दिल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक ठवकर यांनी केले, तर आभार पोलीस उपनिरीक्षक जोहेब शेख यांनी मानले.
खडकी येथे जनजागरण मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:38 AM