जरा हटके! ध्येयवेडा अभियंता झोपडीतून देतो गोरगरीबांना शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 11:39 AM2020-06-09T11:39:37+5:302020-06-09T11:39:59+5:30
भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील दावेझरी हे ३०० लोकसंख्येचे गाव. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला एक तरुण गावातील मुलांना शिक्षण देतो आहे.
राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सॉफ्टवेअर अभियांत्रिकीची पदवी घेवून तो गावात आला. गावातील शिक्षणाची अवस्था पाहून मन हेलावून गेले. गोरगरीब विद्यार्थ्यांचे कसे होणार, अशी चिंता त्याला सतावू लागली. मनाशी खूणगाठ बांधली आणि गावातच एक झोपडी बांधून गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देऊ लागला. सुरूवातीला गावकऱ्यांनी त्याला सुरूवातीला वेड्यात काढले. परंतु त्याने जिद्द सोडली नाही. आता त्याच्या मदतीला समाज धावून आला. एक एक शैक्षणिक साहित्य गोळा होवून तुमसर तालुक्यातील दावेझरी (आ) येथे ज्ञानयज्ञ सुरू झाला. या ध्येयवेड्या तरूणाचे नाव आहे, जय मोरे.
भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील दावेझरी हे ३०० लोकसंख्येचे गाव. विकास काय असतो हे येथे पोहचलेच नाही. शिक्षणाचीही अशीच अवस्था. मात्र या गावातील एका ध्येवेड्या तरूणाने सॉफ्टवेअर अभियांत्रिकीची पदवी घेतली. महानगरात मोठ्या पगाराची नोकरी मिळणे शक्य होते. परंतु त्याने गाव गाठले. गावातील शिक्षणाची अवस्था पाहून मन कळवळून आले. शासन प्रशासन कुणीच लक्ष देत नसल्याने गावाचा विकास खुंटला. भावीपिढी शिक्षणापासून दूर जात असल्याचे लक्षात आले. अशा या गावातील मुलांसाठी काही तरी करायची खूणगाठ बांधली.
जिद्द चिकाटीच्या जोरावर गावातील एका रिकामाच्या जागेवर झोपडी तयार केली. सिमेंटच्या पोत्यांचे आच्छादन घालून त्यात गावातील विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केली. गावातील गोरगरीबांची मुले तेथे शिक्षण शिकण्यासाठी येवू लागले. मात्र उच्च शिक्षित तरूण हा काय वेडेपणा करतो, असे मन सुरूवातीला गावकऱ्यांनी त्याची हेटाळणी केली. मात्र तो खचला नाही. पुन्हा जोमाने आपले ज्ञानसत्र सुरू केले.
आता त्याने याठिकाणी स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेणे सुरू केले आहे. रात्रपाळीची शाळाही सुरू केली. शिक्षणाचे पवित्र काम करून तो या गावातील तरूणांना स्पर्धा परीक्षेत अव्वल आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याची ही जिद्द पाहून आता गावकरीही मदतीला धावून आले. एक एक करीत आता तेथे असंख्य पुस्तके जमा झाली. याच भरोशावर तो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करीत आहे. एका उच्च शिक्षित ध्येयवेडा तरूणामुळे गावातील विद्यार्थ्यात आता उत्साह संचारला आहे.