करडीचा शुभम् युपीएससीची ‘आयईएस’ परीक्षा उत्तीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:25 PM2018-11-12T22:25:04+5:302018-11-12T22:25:17+5:30
ग्रामीण भागातील करडी येथील शुभम् गिरधारी लोंदासे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस (आयईएस) परिक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तो ९७ वा मेरिट आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रामीण भागातील करडी येथील शुभम् गिरधारी लोंदासे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस (आयईएस) परिक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेत तो ९७ वा मेरिट आला आहे.
शुभम हा करडी येथील रहीवासी असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण भंडारा येथील लालबहादूर शाळेत झाले. तो २०११ साली दहावीत मॅरीट आला होता. सध्या शुभम गोहाटी आयआयटीमध्ये एम टेक प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. त्याने सप्टेबर-आॅक्टोबर मध्ये घेण्यात आलेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयईएस ही परीक्षा दिली. या परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले आहे. मेकॅनिकल इंजिनिअर पदवी प्राप्त ग्रामीण भागातील तरुणाने जिल्ह्याच्या मानात यशाचा तुरा खोवला आहे. शुभमचे वडील गिरधारी लोंदासे हे भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असून आई पौर्णिमा या रॉयल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षीका आहे. शुभम हा लहाणपणापासून कुशाग्र बुध्दीचा असून त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल प्राचार्य दत्ताराम देशमुख, एस. आर. खिलोटे यांनी त्याचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे त्याची मोठी बहीन मयुरी लोंदासे हिने एम. टेकची परिक्षा उत्तीर्ण केली असून लहान बहिन प्रांशू बी आर्किटेक्ट करित आहे. या परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.