भंडारा जिल्ह्यामध्ये प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखनी, लाखांदूर, पवनी व साकोली या सात तालुक्यांत अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभ मिळावा यासाठी आदिवासी विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात गावनिहाय व तालुकानिहाय सर्वेक्षण करून लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गरिबातील गरीब लाभार्थ्यांना लाभ द्यावयाचा असून, खावटी अनुदान योजनेपासून काही गरजू आदिवासी लाभार्थी वंचित असतील किंवा काही कारणास्तव अर्ज भरले नसतील, कामानिमित्त बाहेरगावी गेले असतील तसेच कागदपत्राअभावी गरजू लाभार्थी योजनेचा अर्ज भरणे बाकी असतील तर त्यादृष्टीने जवळच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेत तसेच शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहामधील गृहपाल किंवा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय भंडारा कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे ज्यामध्ये परितक्त्या, घटस्फोटीत महिला, विधवा, भूमिहीन शेतमजूर, दिव्यांग व्यक्ती असलेले कुटुंब, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब तसेच वैयक्तिक वनहक्क प्राप्त झालेली वनहक्कधारक कुटुंब यांना लाभ घेता येणार आहे.
अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना साहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:42 AM