लाखनीत अवैध प्रवासी वाहनांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:09 AM2019-06-26T01:09:58+5:302019-06-26T01:10:30+5:30
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लाखनी शहरातील रस्त्यांना सध्या अवैध प्रवासी वाहनांचा विळखा पडला आहे. प्रत्येक रस्त्यावर अवैध प्रवासी वाहनांचा गोंधळ सुरू असतो. साकोली तालुक्यातील कुंभली येथील अपघातानंतरही येथील अवैध प्रवासी वाहतुकीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लाखनी शहरातील रस्त्यांना सध्या अवैध प्रवासी वाहनांचा विळखा पडला आहे. प्रत्येक रस्त्यावर अवैध प्रवासी वाहनांचा गोंधळ सुरू असतो. साकोली तालुक्यातील कुंभली येथील अपघातानंतरही येथील अवैध प्रवासी वाहतुकीवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे वाहतुकदारांचे मनोबल वाढले असून अपघाताची भीती आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर लाखनी शहर व उपनगर असलेले मुरमाडी (सावरी) वसलेले आहे. दोन्ही गावांची लोकसंख्या २० हजाराच्या आसपास आहे. तसेच परिसरातील दीडशे पेक्षा अधिक गावांची लाखनी बाजारपेठ आहे. त्यामुळे येथे नेहमी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या रस्त्यावर सध्या अवैध प्रवासी वाहनांचा धुमाकूळ सुरू आहे. तहसील कार्यालयाजवळील समर्थनगर ते बसस्थानक, बाजार चौक, मुख्य बसस्थानक याठिकाणी काळी-पिवळी वाहने उभी असतात. सध्या लाखनी शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे आधीच येथे वाहतूक जीवघेणी झाली आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतुकदारांच्या मनमानी सुरू आहे.
साकोली तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीच्या पुलावरून काळी-पिवळी जीव कोसळून सहा निष्पाक जीवांचा बळी गेला होता. त्यानंतर दोन दिवस लाखनी येथील वाहतूक काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. परंतु पुन्हा पोलिसांच्या आशिर्वादाने ही वाहतूक सुरू आहे. लाखनी ते सालेभाटा, निलागोंदी, केसलवाडा-पवार, पालांदूर चौ., मुरमाडी तुप., साकोली, भंडारा अशी वाहतूक जोमात सुरू आहे.
आॅटोरिक्षा चालकांची मरमानी
तहसील कार्याल्यासमोर असलेल्या समर्थनगर बसथांब्यावर दिवसभर आॅटोरिक्षा उभे असतात. त्याठिकाणी साधारण व जलद बसेस थांबतात. त्यांच्यासमोर आॅटोरिक्षा, काळी-पिवळी वाहने उभी असतात. त्यामुळे बस थांब्यावर थांबल्यानंतर प्रवाशांना बसच्या मागे धावावे लागते. याठिकाणी समर्थ विद्यालय, गांधी विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, समर्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. एकीकडे उड्डाणपूलाचे बांधकाम आणि दुसरीकडे अवैध वाहनांची गर्दी असे दृश्य असते.