अन्न-पाण्यावाचून बिबट्याचा मृत्यू; चप्राड - सोनी मार्गावर आढळला कुजलेला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 02:24 PM2019-07-23T14:24:30+5:302019-07-23T14:24:30+5:30
चप्राड - सोनी मार्गावरील पुलाखालील घटना
भंडारा (लाखांदुर ) : पाणी व शिकारीच्या शोधात भटकलेल्या एका बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह लाखांदूर तालुक्यातील सोनी चप्राड मार्गावरील पुलाखाली आढळून आला. मंगळवारी (दि.२३ ) सकाळी काही युवकांना या भागातील दुर्गंधीवरून हे लक्षात आले.
बिबट्याच्या मृत्युसंबंधी वनविभागातील काही अधिकारी- कर्मचाऱ्यांशी बातचीत केली असता, बिबट्याचा मृत्यु संशयास्पद नसून, पाणी अथवा शिकारीच्या शोधात असताना त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला. मात्र, जवळपास दोन वर्षे वयोमान असलेला बिबट्याचा वाहनाच्या धडकेने किंवा अन्न पाण्यावाचून मृत्यू तर झाला नसावा ना अशी शंकादेखील घेतली जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे सहाय्यक ऊपवनसंरक्षक एच. सी. पवार, वनपरीक्षेञाधिकारी आर. एस. दोनोडे, क्षेञसहाय्यक आर.ओ. दकरीया , जे. के. दिघोरे, बिटरक्षक भजे , भोगे म्याडम व बिटरक्षक पी. बी. ढोले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सबंधित मृतदेहाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. राऊत यांच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करून कुजलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह जाळण्यात आला. शवविच्छेदन अहवालावरून मृत्यू नेमका कशामुळे झाला समजेल. वन्य प्राण्यांचे गावाकडे होणारे शिरकाव वनविभागाच्या कर्तव्यतत्परतेवर प्रश्नचिन्ह लावणारे दिसत आहे.