भंडारा: लाखांदूर तालुक्याच्या राजनी येथे रविवारी सकाळी ६ वाजता बिबट्याने गावात प्रवेश करून एकास गंभीर जखमी केले. तर एका घरात शिरून तब्बल सात तास ठिय्या मांडला होता. यामुळे संपूर्ण गावभर दहशत पसरली होती. बिबट्याला पाहण्यास प्रचंड गर्दी झाली होती. वनविभागाने सात तासांनंतर बिबट्यास बंदिस्त केले. लाखांदूरवरून १५ कि.मी.अंतरावर असलेल्या राजनी या गावात रविवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास शेतशिवारातून आलेल्या बिबट्याने प्रवेश केला आणि गुरूदेव निंबेकर यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुरूदेव नालीत पडला. त्यानंतर बिबट्याने केवळराम गोविंदा प्रधान यांच्या घरासमोर गोठ्यात गुरे बांधली दिसल्याने बिबट्यानं त्या दिशेने धाव घेतली. गुरांच्या गोठ्याला लागूनच केवळराम प्रधान यांची स्वयंपाक खोली असून त्यात केवळराम प्रधान यांची सून पौर्णिमा प्रधान स्वयंपाक करत होती. 'बिबट आला बिबट आला' म्हणत लोकांनी आरडा-ओरड केली असता, पौर्णिमा देखील स्वयंपाक खोलीतून बाहेर पडली आणि बिबट्याने स्वयंपाक खोलीत प्रवेश घेतला. बिबट्याला पाहण्यास संपूर्ण गाव एकवटल्यानंतर गावातील गोपाल तरेकार नामक व्यक्तीने समयसुचकता बाळगत बिबट आत घुसलेल्या स्वयंपाक खोलीचे दार बाहेरून लावून घेतले व लाखांदूरचे वनपरिक्षेत्राधिकारी रमेश दोनोडे यांना माहिती दिली. त्यानंतर वनविभाग लाखांदूरचं चमू राजनी गावात दाखल झालं सोबतच पोलीस बंदोबस्तात लोकांची गर्दी कमी करत संपूर्ण घराला जाळे लावत बिबट्याला बंदिस्त करण्यासाठी भंडारा येथून पिंजरा आणल्या गेला. मात्र बिबट्याला पिंजऱ्यात बंदिस्त करता आले नसल्याने ट्रँग्युलायझेशन पथकाकडून बंदुकीद्वारे बिबट्याला बेशुद्ध करून बंदिस्त करण्यात आले. बंदिस्त करेपर्यंत बिबट पाहण्यासाठी तालुक्यातील असंख्य लोकांनी गर्दी केली असल्याने लोकांना शांत करताना पोलीस बंदोबस्त तोकडा असल्याने पोलीस प्रशासन व वनविभागाला दमछाक करावी लागली. दरम्यान सलग सात तासांनंतर स्वयंपाक खोलीत ठिय्या मांडून बसलेल्या बिबट्याला बंदिस्त करण्यात आले. बिबट्याला बंदिस्त करताना वनपरिक्षेञाधिकारी रमेश दोनोडे, सहाय्यक वन संरक्षक पवार साहेब साकोली, वनपाल कु.बि.एच.गजापुरे (रोकडे), बि.एच.मंजलवार, एस.जी.जाधव, व्हि.बी.पंचभाई, ए.जे.वासनिक, जे.के.दिघोरे, पोलीस नायक तलमले, कठाने, वैरागडे, लखन उईके यांचा समावेश होता. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले गुरूदेव निंबेकर यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालय लाखांदूर येथे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या हाताला जखम झाली आहे.
राजनी गावात बिबट्याचा थरार, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 3:23 PM