विजेच्या धक्क्याने बिबट्या ठार, वन विभागाने तात्काळ घेतली धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 05:28 PM2021-10-17T17:28:43+5:302021-10-17T17:29:37+5:30
कोका येथील घटना, शवविच्छेनानंतर गुपीत उघड, भंडारा वनवृतात खळबळ
करडीपालोरा (भंडारा) : कोका वन्यजीव अभयारण्याला लागून असलेल्या कोका गावाबाहेरील बोडीत रविवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास एका सहा वर्षीय नर बिबट्याचा मृतदेह आढळून आला. बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्यानंतर शेतशिवारातून बोडीत आणून फेकल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले.
रविवारी सकाळी कोका गावाजवळील बोडीत पाळीशेजारी एक नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांची गर्दी बोडीच्या दिशेने जात असल्याचे वनाधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. वरिष्ठांना इत्यंभूत माहिती देताच वनाधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. साकोली वन्यजीव कार्यालयातून डॉग स्कॉट पाचारण करण्यात आले. बोडी शेजारील शेतशिवारात शोधमोहीम राबविण्यात आली. बिबट्याच्या मृतदेहाला कोका येथील वनविश्रामगृहात हलविण्यात आले. लाखनीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके व मानेगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठल हटवार यांनी शवविच्छेदन केल्यानंतर परिसरातच दाह संस्कार करण्यात आले.
दरम्यान, यावेळी भंडाराचे वनसंरक्षक एस. बी. भलावी, सहाय्यक उपवनसंरक्षक एस.एन. शेंडे, वनपरिक्षेत्राधिकारी विवेक राजूरकर, सहाय्यक वनपरिक्षेत्राधिकारी जी. आर. नागदेवे, वनरक्षक तिरपूडे, कोका वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी आर. पी. धनविज व वनकर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
'मृत बिबट्या हा नर जातीचा असून ५ ते ६ वर्षांचा आहे. कोका गावाशेजारील बोडी लगत शेतशिवार असून विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. शिकारीच्या शोधात बिबट असतांना सकाळी ७.३० वाजताचे दरम्यान छाती व अन्य भागास विजेचा धक्का लागल्याने तो जागीच ठार झाला.
-डॉ. गणवंत भडके, पशुधन विकास अधिकारी मानेगाव.