युती करू तर घट्ट करू
By Admin | Published: July 9, 2015 12:34 AM2015-07-09T00:34:23+5:302015-07-09T00:34:23+5:30
जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ उमेदवार निवडून आले आहेत.
सेवक वाघाये : पत्रपरिषदेत दिली माहिती
भंडारा : जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १९ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत काँग्रेस हा मोठा पक्ष म्हणून आघाडीवर आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करायची असल्यास ती घट्ट करू अन्यथा करणार नाही, असे ठाम मत माजी आमदार सेवक वाघाये यांनी व्यक्त केले. आज सायंकाळी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी प्रथमच पत्रपरिषद घेतली. यावेळी सेवक वाघाये म्हणाले, मागील अनुभव लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यावेळी आम्ही प्रस्तावाबाबत चर्चा करणार नाही. मात्र राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यास जिल्हा परिषदेत सत्ता काबीज करण्यावर चर्चा केली जाईल. राष्ट्रवादीसोबत युती करायची की नाही याबाबत दि. १० जुलै रोजी राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. यात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यावरच युती संदर्भात निर्णय घेतल्या जाईल. त्याचदिवशी जिल्हा परिषद सदस्यांमधून गटनेत्याची निवड केली जाईल. सध्या काँग्रेसकडे १९ सदस्य असून तीन अपक्ष उमेदवारांचा पाठींबा मिळाला आहे. एका अपक्ष सदस्यासह शिवसेनेच्या विजयी उमेदवाराशी आमची चर्चा सुरु असल्याचे सांगितले. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसशी युती झाल्यास जिल्हा परिषदेत त्यांच्या वाट्याला फक्त दोन पद दिले जातील. यात एक उपाध्यक्षपद व एक सभापतीपद किंवा दोन्ही सभापतीपद दिले जातील. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला लवकरच नवीन अध्यक्ष दिले जाणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्याकडे सोपविल्यास ती आपण पार पाडणार काय? या प्रश्नाच्या उत्तरावर वाघाये यांनी आपला होकार दर्शविला.
पत्रपरिषदेला नवनियुक्त जि.प. सदस्य प्राचार्य होमराज कापगते, रमेश डोंगरे, प्रदीप बुराडे, ज्ञानेश्वर राहांगडाले, पंधरे, मनोहर राऊत आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद निवडणुकीत चर्चा नसतानाही काँग्रेस पक्षाला दमखमपणे निवडणुकीत दमदार यश मिळाले. त्यामुळे सेवक वाघाये यांची आशा बळावली आहे. आजच्या पत्रपरिषदेतही सेवक वाघाये यांनी आगामी निवडणुकीसंदर्भातही काँग्रेस हा पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सुतोवाच केले. (प्रतिनिधी)