राजू बांते
मोहाडी (भंडारा) : शेतात रोवणी सुरू असताना अचानक वीज कोसळून तरूण शेतकरी ठार तर १५ महिला मजूर किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ८.१५ वाजता तालुक्यातील माेहगावदेवी येथे घडली. शुभम विजय लेंडे (२६) रा. मोहगावदेवी ता. मोहाडी असे मृताचे नाव आहे.
जिल्ह्यात २४ तासांत जोरदार पाऊस झाला असून २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दमदार पावसाने शेतीच्या कामाला वेग आला आहे. रात्रीपासूनच परिसरात पावसाने थैमान घातले होते. बुधवारी सकाळी शुभम लेंडे यांच्या भात रोवणी सुरू होती. त्यावेळी विजाही कडाडत होत्या. शुभम पऱ्ह्याच्या पेंड्या शेतात टाकत होता. तर महिला रोवणी करीत होत्या. सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास बांधित अचानक वीज कोसळली. त्यात शुभम गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. तर महिला मजूर जखमी झाल्यात.
सविता संजय तलमले (३७), अश्विनी आंबीलकर (२९), नीतू जितेंद्र वानखडे (३०), भुमेश्वरी संदीप साखरवाडे (२७), रविना विनोद लेंडे (१८), नंदा मोहन बाळबुधे (२८), जनाबाई दशरथ लेंडे (५०), नीला विनोद लेंडे (४०), कविता कैलास देशमुख (३५), वर्षा नरेंद्र लेंडे (२७), सुरेखा प्रमोद लेंडे (३४), पुस्तकला अमर लेंडे (६०), सुमन वामन लेंडे (६०), यमुना मूलचंद लेंडे (६५), सकू मनोहर लेंडे (५८) अशी जखमी महिलांची नावे आहेत.
घटनेची माहिती गावात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शुभमला मोहाडी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याल मृत घोषित केले. जखमी मजुरांवर मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती महसूल विभागाला देण्यात आली. तलाठ्याने घटनास्थळाचा पंचनामा केला. तर या घटनेची तक्रार वरठी ठाण्यात देण्यात आली. शुभम हा अविवाहित असून त्याच्या मागे वडील, आई, आजोबा व एक भाऊ असा परिवार आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.