पंचायत राजमुळे महिलांना सत्तेत वाटा मिळाला. महिलांना सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगर परिषद अध्यक्ष असे महत्त्वाची विविध पदे भूषविण्याची संधी मिळाली. भंडारा जिल्ह्यातील एका तालुक्यात असेच घडत आहे. काहींनी संधीचे सोने केले तर काहींनी घरच्या सरांकडे पदाची जबाबदारी सोपवली. ज्यांनी संधीचे सोने केले त्यांचे राजकारणातील भविष्य उज्ज्वल झाले, मात्र ज्यांनी घरच्या सरांकडे जबाबदारी सोपवली त्या महिला तिथेच थांबल्या. फरक एवढाच की अशा महिलांच्या सरांनी गावात विकास कामे करताना स्वतःचा सर्वतोपरी विकास करून घेतला. नगरात व नगर परिषदेत काय चालले याची तसूभरही कल्पना नगराध्यक्षा मॅडम ना राहत नाही. इत्थंभूत माहिती सरांकडे उपलब्ध असते. तसेच सरपंच व अन्य महत्त्वाच्या पदावर विराजमान महिला ज्यांनी घरच्या सरांकडे जबाबदारी सोपवली त्यांचेही तसेच असते. एकदा अन्यायग्रस्त नागरिक अध्यक्षांकडे समस्या घेऊन गेले, पण त्यांना जे उत्तर मिळाले ते थक्क करणारे होते. मॅडमनी स्पष्ट शब्दात सांगितले तिथे काम सुरू असल्याची माहितीच त्यांना नाही. आता बोला... नगराध्यक्ष कोण?
मॅडम नगराध्यक्ष असणे बरे नव्हे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 4:22 AM