आॅनलाईन लोकमतभंडारा : बौद्ध विहार हे प्रार्थना केंद्र व पूजापाठ करण्यासाठी नव्हे तर, मानवाच्या विकासासाठी तयार करावे, त्याचा पूर्वीचा पायाच मानव विकासावर आधारित होता. त्यामुळे ५०० वर्षापूर्वी बौद्ध विहारात मूर्तीला महत्त्व न देता विचार मंथनासाठी व बौद्धधम्माच्या प्रचारासाठी देण्यात आला होता. म्हणून आजघडीला बौद्ध विहार हे मानव विकासाचे केंद्र बनावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता अजाबराव शास्त्री यांनी केले.बौद्ध विहार समितीच्या वतीने सोमवारला सिल्ली येथील मिनी दीक्षाभूमीच्या चतुर्थ वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.जगजीवन कोटांगले, प्रा.शिलवंत मडामे, राष्ट्रवादीचे भंडारा जिल्हा सचिव मनिष वासनिक, सरपंच निर्भय क्षीरसागर, ज्येष्ठ नागरिक कार्तिक सूर्यवंशी, लोकशाहीर कार्तीक मेश्राम, मोनू गोस्वामी, भंते दिपज्योती, बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष रविंद्र गजभिये, सुधाकर मेश्राम आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.यावेळी सिल्ली येथील नवनिर्वाचित सरपंच निर्भय क्षीरसागर यांचा बौद्ध विहार समितीच्या वतीने अजाबराव शास्त्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शास्त्री म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकट्या दलित समाजाचे नसून ते संपूर्ण बहुजन समाजाचे पुढारी आहेत. बाबासाहेबांनी आपल्या जीवनकार्यात सर्वात जास्त काम बहुजन जातीसाठीच केले असून ते खºया अर्थाने बहुजनांचे पुढारी आहेत. त्यामुळे आतातरी बहुजनांनी जागृत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाला स्वीकारण्याची खरी गरज आहे. ज्यांनी बाबासाहेबांना स्वीकारले नाही त्यांची अधोगती निश्चितच आहे. बहुजनांना धार्मिकतेत व अंधश्रद्धेत गोठवून ठेवण्याचे काम मनुस्मृतीवाद्यांनी केले आहे. याकरिता आता खºया अर्थाने बहुजन समाजाने जागृत होवून बाबासाहेबांना समजण्याची गरज आहे. आता सर्व जातीच्या बहुजनांनी एकजुटीने राहून मनुवाद्यांच्या मनसुब्याला पछाडणे गरजेचे आहे, तरच संविधानाला व लोकशाहीला खºया अर्थाने वाचविणे शक्य होईल. नाहीतर गुलामगिरीला सामोरे जाणे जवळच आहे. डॉ.बाबासाहेबांच्या वाटचालीत माता रमाईने दिलेला मोलाचा वाटा व केलेला त्याग अत्यंत महत्वाचा आहे. माई रमाई नसती तर कदाचित बाबासाहेब घडलेच नसते. म्हणून बहुजन समाजाला गुलामगिरीतून काढण्यात सिंहाचा वाटा हा माई रमाईचाही आहे. माई रमाईचा त्याग व समर्पण समाज बांधवांना नेहमीच लक्षात ठेवावा. आजच्या महिलांनी माई रमाईचा आदर्श सदैव तेवत ठेवणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन शास्त्री यांनी केले.यावेळी विचारमंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे प्रा.जगजीवन कोटांगले व प्रा.शिलवंत मडामे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुद्ध विहार समितीचे सचिव विवेक गजभिये यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन विलास खोब्रागडे यांनी केले.
बौद्ध विहार विकासाचे केंद्र बनावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 10:22 PM
बौद्ध विहार हे प्रार्थना केंद्र व पूजापाठ करण्यासाठी नव्हे तर, मानवाच्या विकासासाठी तयार करावे, त्याचा पूर्वीचा पायाच मानव विकासावर आधारित होता.
ठळक मुद्देअजाबराव शास्त्री : सिल्ली येथे मिनी दीक्षाभूमीचा चतुर्थ वर्धापन दिन